मुरुड समुद्रकिनाऱ्यावर १ फेब्रुवारीला झालेल्या दुर्घटनेत १४ पर्यटकांना आपले जीव गमवावे लागले होते. यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्ह्य़ातील समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून चार तालुक्यांत ही योजना राबविली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील अबेदा इनामदार महाविद्यालयातील ११५ विद्यार्थी सहलीसाठी मुरुडला आले होते. १ फेब्रुवारीला दुपारी जेवणानंतर यातील काही जण समुद्रात उतरले, पाण्याचा अंदाज न आल्याने यातील १८ जण बुडाले, स्थानिक कोळ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र तोवर १४ जणांचा मृत्यू झाला होता. यात १० मुली आणि ४ मुलांचा समावेश होता. चार जणांना वाचवण्यात यश आले होते. एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पर्यटकांचे जीव गेल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चव्हाटय़ावर आला होता. याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आणि समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काही पावले उचलली आहेत.

जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत चार तालुक्यांना २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण तालुक्यांचा समावेश आहे. समुद्रकिनाऱ्यावरील आपत्ती निवारणासाठी उपाययोजना करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू तथा सामानाच्या खरेदीसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण नगरपालिकांना प्रत्येकी अडीच लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तर अलिबाग तहसीलदार कार्यालयास ५ लाख, श्रीवर्धन आणि मुरुड तहसीलदारांना प्रत्येकी दोन लाख, तर उरण तहसीलदारांना १ लाख रुपयांचा निधीही वर्ग करण्यात आला आहे.

या निधीचा वापर करून समुद्रकिनाऱ्यावर धोक्याची सूचना देणारे फलक बसविले जाणार आहेत. त्याचबरोबर मदत व बचावकार्यासाठी स्ट्रेचर, लाइफ जॅकेट, िरग बोयाज, फ्लोट, वॉच टॉवर आणि पर्यटकांना धोक्याची सूचना देण्यासाठी ध्वनिप्रक्षेपक यांसारख्या आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

जिल्हा नियोजन मंडळाकडून अलिबाग नगर पालिकेला अडीच लाखांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीचा वापर करून नगरपालिकेने २५ लाइफ जॅकेट्स, २ टॉर्च, ५ िरग बोया, ५ फ्लोट, १ वॉच टॉवर, १ ध्वनिप्रक्षेपक समुद्रकिनाऱ्यावर उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय नगर पालिकेने ५ पूर्णवेळ जीवरक्षकांनी नियुक्ती केली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Safety of sea tourist