विश्वास पवार

काश्मीरची ओळख असलेल्या केशराची महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे लागवड करण्यात येत आहे. राज्यात प्रथमच होत असलेली ही केशर लागवड राज्याच्या कृषी विभागातर्फे प्रायोगिक तत्त्वावर केली जात आहे. ही लागवड यशस्वी झाल्यास या गिरिस्थळाची स्ट्रॉबेरीसोबत केशरसाठीही ओळख तयार होऊ शकेल.

‘काश्मिरी केशर’ हा जगभरात उत्कृष्ट केशर म्हणून ओळखला जातो. या केशरचा भाव सरासरी साडेतीन लाख रुपये किलो असा आहे. काश्मीरमध्ये पंपोरे आणि कीरतवाड येथे या केशराचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

केशराच्या लागवडीसाठी विशिष्ट प्रकारचे हवामान, जमीन, प्रदेशउंची लागते. या उत्पादनासाठी लागणारे क्षेत्र हे समुद्रसपाटीपासून दोन ते अडीच हजार मीटर उंचीवरील असावे लागते. तेथील तापमान हे सरासरी १० डिग्री सेल्सियस असावे लागते. अशा ठिकाणी कंदाद्वारे एक फूट अंतरावर याची लागवड केली जाते. केशराची वाढ पंधरा ते पंचवीस सेंटिमीटपर्यंत होते. याला गवतासारखी निमुळती होत जाणारी पाने, तर जांभळ्या रंगाची फुले येतात. या फुलांमध्येच पिवळसर केशरी कोष तयार होतो. साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात लागवड केली जाते, तर डिसेंबर-जानेवारी महिन्यात त्याला फुले येतात. जानेवारी महिन्यात ही फुले खुडून उन्हात वाळवून त्यापासून केशर मिळवले जाते.

केशराच्या शेतीसाठी क्षेत्र महाबळेश्वर येथील गणेश जांभळे आणि मेटगुताड येथील दीपक व अशोक बावडेकर या प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड केली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे यांनी दिली.

साडेतीनशे कंद आणले..

महाबळेश्वरमधील केशर लागवडीसाठी काश्मीर येथील किरतवाड येथून कंद आणले आहेत. केशराचे हे कंद चोवीसशे रुपये किलोप्रमाणे मिळतात. एक किलोमध्ये पस्तीस ते चाळीस कंद येतात. सध्या प्रायोगिक तत्त्वावर साडेतीनशे कंद मागविण्यात आले आहेत. त्याचा खर्च कृषी साहाय्यकांनी स्वत:च्या खिशातून केला असून उत्पादन आल्यानंतर शेतकरी त्याची परतफेड करणार आहेत.

महाराष्ट्र कृषी विभाग महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना येथील वातावरणाचा फायदा घेऊन नावीन्यपूर्ण शेती प्रयोग राबवण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. येथील हवामान, जमीन हे केशरसाठी चांगले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास येथील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीबरोबर उत्पन्नाचा आणखी एक चांगला स्रोत उपलब्ध होईल.

– दीपक बोर्डे, कृषी साहाय्यक, महाबळेश्वर

होणार काय?

जगामध्ये भारत, स्पेन, इराक, फ्रान्स, इटली, तुर्की, चीन येथे केशराची लागवड केली जाते. भारतात ही लागवड फक्त काश्मीरमध्ये केली जाते. काश्मीर आणि महाबळेश्वरमधील हवामान, जमिनीचा अभ्यास करत राज्याच्या कृषी विभागातर्फे महाबळेश्वरमध्येही काही क्षेत्रावर केशर लागवडीचा प्रयोग घेण्यात येणार आहे.

Story img Loader