राष्ट्रवादी काँग्रेसने दिवाळीनिमित्त पुणे जिल्ह्यातील सासवड येथे एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांनी यावेळी नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. दरम्यान, या कार्यक्रमात एक मजेशीर घटना घडली आहे.
या कार्यक्रमात आपली समस्या मांडण्यासाठी आलेल्या एका नागरिकाने शरद पवारांना उद्देशून म्हटलं, “साहेब, मागील दहा वर्षांच्या काळात तुम्ही दोनदा माझ्या स्वप्नात आला होतात” हे ऐकताच शरद पवारांनी मिश्किलपणे संबंधित नागरिकास विचारलं की, “हे स्वप्न पहाटे पडलं होतं की मध्यरात्री?” पवारांच्या या मिश्किल प्रश्नानंतर व्यासपीठावर एकच हशा पिकला. यानंतर शरद पवारांनी संबंधित नागरिकाची समस्या जाणून घेतली आणि स्थानिक नेत्याशी चर्चा करून संबंधित समस्या सोडवण्याची सूचना दिली.
यावेळी अन्य एका शेतकऱ्यानं शरद पवारांना बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला. त्यावर शरद पवार म्हणाले, “जेजुरीच्या सहकऱ्यानं सांगितलं की, बाहेर फिरु नका. पण त्यांना काय वाटतं? मी म्हातारा झालो आहे का? कुणी सांगितलं मी म्हातारा झालोय, तुम्ही काय बघितलं? मी म्हातारा झालो नाही,” असं शरद पवारांनी म्हटलं.
हेही वाचा- कुणी सांगितलं म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलं; शरद पवारांची तुफान फटकेबाजी
दरम्यान, या कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद पवारांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशाची आणि राज्याची ज्यांच्याकडे सूत्रे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांचं हित जपण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. मात्र, ठोस पावलं उचलण्याची त्यांची तयारी दिसत नाही. माझ्याकडे केंद्राची जबाबदारी होती, तेव्हा तीन महिन्यांमध्येच मी ७२ हजार कोटींचं कर्ज माफ केलं होतं” असंही पवार म्हणाले.