साहित्य अकादमी पुरस्कारांची आज घोषणा झाली आहे. यामध्ये २२ प्रादेशिक भाषांसाठी युवा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. “बाळूच्या अवस्थांतराची डायरी” या पुस्तकासाठी कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक डॉ. किरण गुरव यांना साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. तसेच, मराठीतील युवा लेखक प्रणव सखदेव यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे व संजय वाघ यांना बाल पुरस्कार यांना जाहीर झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर किरण गुरव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटल की, ”साहित्य अकादमी पुरस्काराचा खूप आनंद साहाजिकच आहे. माझ्याबरोबरच कथा या साहित्य प्रकाराला बळ देणारा हा पुरस्कार आहे. खेड्यापाड्यातील नव्यानं लिहितं होणाऱ्या मुलांना कथा हा साहित्यप्रकार त्यातल्या वेल्हाळपणामुळं खूप आपलासा वाटतो. बाळूच्या अवस्थांतराची डायरी या शिर्षक कथेतील बाळू हा अशा मुलांचा प्रतिनिधी आहे. शिक्षणासाठी शहराकडे होणारे बाळूचे स्थलांतर हळूहळू त्याचे मानसिक अवस्थांतर बनते. बाळूची खेडूत मानसिकता आणि तिला दिसणारे आक्राळ विक्राळ शहर यांच्यातील टकराव हा एक सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील अनेक मुलांना ही कथा त्यांचीच वाटते. या संग्रहातली इंदूलकरांची कथा ही देखील कथानिर्मिती, लेखकाचे चरित्र आणि त्याचा काळ यांची परस्पर गुंफण तपासते. या इंदुलकरांना कधीकधी त्राग्यानं जीवसृष्टीत जन्माला आल्याबद्दल वाईटही वाटतं. पण कथेत सरतेशेवटी ते आपल्या जन्मास कारण ठरलेल्या भैरीस्वरूप निसर्गाचे, आई-वडिलांचे शुक्रगुजार होतात. आपला जन्म म्हणजे या सर्वांनी मिळून सृष्टीत घडवून आणलेला एक छोटासा जैविक महास्फोट आहे या निष्कर्षाला ते अखेरीस येतात.”

तसेच, ”पुरस्काराबद्दल अकादमीचे मन:पूर्वक आभार. माझ्यापेक्षा हा कथेचा सन्मान आहे असे मी समजतो. जयंत पवार या अफाट कथाकाराची आठवण या पुरस्काराच्या क्षणी मनाला कातर करत आहे. मराठी कथेला आणि खेड्यातील अनेक लिहित्या हातांना या पुरस्काराने उर्जा मिळावी अशी अपेक्षा.” अशी प्रतिक्रिया किरण गुरव यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन –

मराठी भाषा अभिजात आहेच. या आपल्या मायमराठीत वैविध्यपूर्ण साहित्यकृतींमधून आणखी समृद्ध प्रवाह आणण्याचे महत्वाचे काम लेखक, साहित्यिक मोठ्या उमेदीने करत असतात. त्यांच्या या लेखन प्रवासाला साहित्य अकादमी पुरस्कारामुळे आणखी बळ मिळते, असे नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लघुकथाकार किरण गुरव, कादंबरीकार प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची राष्ट्रीय साहित्य संस्था अर्थात साहित्य अकादमीचे विविध भाषांतील साहित्यकृतीसाठींचे पुरस्कार आज जाहीर झाले. यामध्ये किरण गुरव यांना ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या लघुकथासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार, प्रणव सखदेव यांना ‘काळे करडे स्ट्रोक्स’ कादबंरीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार आणि संजय वाघ यांना ‘जोकर बनला किंगमेकर’ या कादबंरीसाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. या सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार, कसदार अशा साहित्यामध्ये मराठी साहित्यकृतींनी भर घालण्याचे महत्वाचे योगदान या सर्वांनी दिले आहे. माय मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपण जागर सुरु केला आहे. या प्रयत्नात पुरस्कार प्राप्त साहित्यकृतींमधून मराठीच्या अंगभूत वैशिष्ट्यांचीही चर्चा होत राहील. त्यादृष्टीने या साहित्यकृती राष्ट्रीय स्तरावर पोहचणे महत्वाचे आहे. हे यश उदयोन्मुख लेखकांसाठी प्रेरणा देत राहील आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.