साहित्य अकादमी पुरस्कार विजेते नवनाथ गोरे यांची भावना; जगण्याच्या संघर्षांला शब्दांचे माध्यम
सांगली : आई सांगायची, चार बुकं शिकलास तर एखादी नोकरी लागेल. चांगलं-चुंगली कापडं अंगावर येतील, चार घास खायची सोय होईल. खस्ता खात शिक्षणाकडे वळलो, पुढे शिक्षणातून जिवंत झालेल्या जाणिवांतून लिहू लागलो. आपणही आपले जग शब्दात मांडावे असे वाटू लागले. यातूनच ‘फेसाटी’ आकारास आली!
जतसारखा दुष्काळी प्रदेश, घरातील अठरा विश्वद्रारिद्रय अशाही स्थितीत मेंढीपालन करत कसेबसे दिवस काढणारे कुटुंब. या अशा कुटुंबातून शिक्षण घेत पुढे लिहिते झालेल्या नवनाथ गोरे यांना काल त्यांच्या ‘फेसाटी’ या पहिल्याच साहित्यकृतीला थेट साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारानंतर गोरे ‘लोकसत्ता’शी बोलत होते.
सांगली जिल्ह्य़ातील जत तालुक्यातील निगडी बुद्रक हे गोरे यांचे गाव. चार-पाचशे उंबऱ्यांच्या या गावात गोरे यांचे मेंढपाळ कुटुंब. गावाबाहेर झोपडी करून राहणारे. घरात ९ भावंडांमध्ये नवनाथ धाकटे. घरातील काही जण मेंढी पालन तर काही मोलमजुरी करत कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. सगळेच निरक्षर. यामध्ये नवनाथने तरी शिकावे म्हणून साऱ्याच कुटुंबाने त्यांना पाठिंबा आणि हातभार लावला. नवनाथ यांनी मेंढीपालन करत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. मराठी विषयात पदवी मिळवली आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेतला. हे शिक्षण घेत असतानाच मग पुढे आपल्या या संघर्षांलाच शब्दांचे माध्यम बनवत ते व्यक्त देखील होऊ लागले.
नवनाथ म्हणतात,‘ प्रारंभी चार दोन कथा लिहिल्या. त्या नियतकालिकात प्रसिध्दही झाल्या. असे वाटले आपण आपलेच जगणे लिहावे, एकेक प्रकरण लिहित गेलो आणि त्यातून दुष्काळाशी संघर्ष करत शिकू पाहणाऱ्या एका तरुणाचा मोठा पटच उभा राहिला. ‘फेसाटी’ची हीच गोष्ट!’
हा इथला संघर्ष आहे, त्याचा विषय या भूमीतला आहे. यामुळे त्याची भाषा अशीच धनगरी बोलीची ठेवली आहे. पण त्यामुळे ती वाचकांना जास्त भावली असावी. आयुष्यात जे भोगले ते तसेच सांगितले. माझ्या या अनुभवाची, लेखनाची दखल थेट साहित्य अकादमीने घेतल्याने या पुरस्काराचे महत्त्व माझ्यासाठी शब्दातीत आहे. भावी लेखन वाटचालीस या पुरस्कारामुळे मोठी प्रेरणा मिळाल्याचे नवनाथ सांगतात.
ते म्हणतात,की आजही माझी स्वतशीच स्पर्धा आहे. सध्या ते शिवाजी विद्यापीठाचे मराठी अधिव्याख्याते डॉ. रणधीर िशदे यांच्या ‘बौध्द तत्त्वज्ञानाचा मराठी संतकाव्यावर परिणाम’ या संशोधनपर प्रकल्पावर काम करीत आहेत.