चिपळूणमध्ये जानेवारीत आयोजित केलेल्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हिशेब अखेर पूर्ण झाले असून, सर्व खर्च वजा जाता संयोजन समितीच्या हाती फक्त १५ लाख रुपये शिल्लकराहिले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार या संमेलनासाठी विविध मार्गानी एकूण ३ कोटी १५ लाख रुपये जमा झाले, तर संमेलनाचा एकूण खर्च सुमारे ३ कोटींच्या घरात गेला आहे. त्यामुळे यजमान लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या गंगाजळीत या बहुचर्चित संमेलनाद्वारे अवघ्या पंधरा लाख रुपयांची भर पडली आहे. खर्चाचा तपशील दोन दिवसांत जाहीर केला जाणार आहे. पण संमेलनाच्या निमित्ताने प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेले कोकणी खेडे आणि दोन रात्री आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे खर्च आवाक्याबाहेर गेल्याचे सांगितले जाते.
११ ते १३ जानेवारी या काळात चिपळूणमध्ये हे संमेलन मोठय़ा धूमधडाक्यात पार पडले. संस्थेच्या विविध योजना साकार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधी उभारणीच्या हेतूने संमेलन भरवण्यात येत असल्याचे संयोजकांनी सुरुवातीपासून जाहीर केले होते. त्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. संमेलन भव्य-दिव्य करण्याच्या आकांक्षेपायी संमेलनाच्या खर्चावरील संयोजकांचे नियंत्रण सुटले आणि दीड कोटींचा खर्च दुपटीवर गेला.
‘सर्वकोर्येषु..’चा आधार
‘लोकसत्ता’तर्फे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात विविध सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या संस्थांचा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या सदरातून परिचय करून दिला जातो आणि त्यांना उदारहस्ते साहाय्यासाठी आवाहन केले जाते. गेल्या वर्षी लोकमान्य टिळकस्मारक वाचन मंदिराचा या सदरातून परिचय करून देण्यात आला होता. त्यातून संस्थेला सुमारे १२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. हा निधी बँकेत स्वतंत्र खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. साहित्य संमेलनाच्या बिघडलेल्या आर्थिक गणिताच्या पाश्र्वभूमीवर भावी संकल्प साकारण्याच्या दृष्टीने हा निधी मोठा आधार असल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.

Story img Loader