अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या व्यक्तीने दारोदारी जाऊन मत मागावे, हे आपल्याला पटत नाही. त्यामुळे सर्व घटक संस्थांनी या बाबतचा निर्णय एकत्रित येऊन घ्यावा, असे मत ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केले.
‘गेल्या १० वर्षांपासून साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असते. त्यामुळे त्याचे फारसे काही नाही. मात्र, साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे मात्र वाटते,’ असे महानोर म्हणाले.  मात्र, संमेलनाध्यक्ष निवडणुकीबाबत तसे फारसे काही बोलायचे नाही. पाहू या काय होते ते, असेही त्यांनी सांगितले. महानोर यांना निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. त्यांच्या वतीने कोणी तरी अर्ज भरावा, अशी चर्चा होती. मात्र, घटनेच्या तरतुदीनुसार इतर कोणीही त्यांचा अर्ज भरू शकत नाही. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना अर्ज भरावा लागेल, असे बोलले जाते.
अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचेही नाव चर्चेत आहे. या बाबत विचारले असता, ‘काही मित्र मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरावे, असा आग्रह करीत आहेत. अजून निर्णय झाला नाही. मात्र, तसा विचार सुरू आहे,’ असे सासणे यांनीही या संदर्भात सांगितले.
महानोरांच्या नावासाठी मराठवाडय़ातील अनेक साहित्यिक आग्रही आहेत.उद्या (शनिवारी) औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते येणार आहेत. या कार्यक्रमानंतरही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याच्या अनुषंगाने त्यांना गळ घातली जाईल. महानोर यांनी अर्ज दाखल केल्यास निवडणूक बिनविरोध होईल का, याची चाचपणी सुरू आहे. तथापि, निवडणूक होईलच, असे मानणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

Story img Loader