चिपळूण येथे होणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर चिखलफेक करणे योग्य नसून तसे करणाऱ्यांची तोंडे आम्ही प्रत्युत्तराने गप्प करू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष जयद्रथ खताते यांनी आज दिली.  राज्याचे जलसंपदामंत्री तटकरे या खात्याच्या गैरव्यवहारप्रकरणी अडकले असल्यामुळे संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी त्यांच्या निवडीला विविध क्षेत्रांतून विरोध होत आहे. त्याचबरोबर संमेलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असल्याची टीका होत आहे. त्यावर आज प्रथमच या पक्षातर्फे अधिकृत प्रतिक्रिया देताना खताते म्हणाले की, तटकरे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते असून कोकणाच्या विकासासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वागताध्यक्षपदी त्यांची निवड संमेलनाच्या संयोजन समितीने केली आहे. त्यामुळे त्याबाबत समिती जबाबदार आहे, पण या विषयात अकारण राजकारण केले जात आहे. मात्र यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि तटकरेंवर चिखलफेक करणाऱ्यांची तोंडे आम्ही गप्प करू.