कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी कराड, सातारा, कोरेगाव, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा पाच तालुक्यातील ९९ मतदान केंद्रांवर आज शनिवारी किरकोळ अपवाद वगळता चुरशीने जवळपास ८० टक्के मतदान शांततेत पार पडले. कराडमध्ये उद्या रविवारी मतमोजणी होणार असून, सभासदांसह राजकीय वर्तुळात निकालाची उत्सुकता राहिली आहे.
सह्याद्री कारखान्याचे ३२ हजार २०५ सभासद मतदार असून, तळपत्या उन्हातही मतदानासाठी रस्सीखेच होती. तिरंगी लढतीमुळे कुतूहलाच्या बनलेल्या या निवडणुकीत आमदार मनोज घोरपडे, सताधारी आघाडीचे प्रमुख व माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम या तिघांची आपआपल्या आघाडीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे तिन्ही आघाड्यांकडून मतदानासाठी चुरस पाहायला मिळाली.
कराड तालुक्यातील ४९ गावांत ६८, कोरेगाव तालुक्यात ८ गावांत १५, सातारा तालुक्यातील ५ गावांत ६, खटाव तालुक्यातील ३ गावांत ५ आणि कडेगाव तालुक्यातील ३ गावांत ५ मतदान केंद्रांवर हे चुरशीने मतदान झाले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी १ हजार ४० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक होती. चोख बंदोबस्त पार पडलेल्या मतदान प्रक्रियेवर सीसीटीव्ही, व्हिडीओच्या माध्यमातूनही लक्ष ठेवण्यात आले होते. सहकारी संस्था उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.