सातारा: सह्याद्री साखर कारखाना मागील ५३ वर्ष एकाच कुटुंबाकडे आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव येथे आम्ही निवडणूक लढलो. नऊ हजार सभासदांच्या वारस नोंदी रखडवल्यानेच त्यांना निवडणूक जिंकता आली. सह्याद्री जिंकण्याचा सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांचा खोटा अविर्भाव असल्याची टीका कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी साताऱ्यात केली. सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना घोरपडे यांनी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
सहकारातील निवडणुकीला राजकीय संदर्भ नसतात, त्यांच्या विरोधात दहा हजार सभासद आहेत हे त्यांनी विसरू नये. कारखान्याच्या एका निवडणुकीने माजी आमदारांनी हुरळून जाऊ नये . या वारस नोंदी करा, मी आमदारकीचा राजीनामा देतो आणि पुन्हा निवडणूक होऊन जाऊ द्या, कोण जिंकते ते आपण पुन्हा बघूया, असे आव्हान घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांना दिले.
सह्याद्री कारखान्याच्या निकालाच्या प्रकरणावर मी बोलणारच नव्हतो. पण सत्ताधाऱ्यांकडून खोटा अविर्भाव आणला जात आहे. हे सांगण्यासाठी मला बोलावे लागत आहे. सह्याद्री कारखान्याची ५३ वर्ष सत्ता एकाच कुटुंबाकडे होती आणि सत्तेचे विकेंद्रीकरण प्रक्रिया राबवली जावी असा आमचा आग्रह होता. सभासदांनी सुद्धा मेळाव्यात निवडणूक लढवावी असा आग्रह धरला होता.
निवडणुकीमध्ये कराड दक्षिण ,खटाव, कराड उत्तरच्या काही भागातून आमच्या उमेदवारांना आठ हजार मते मिळाली. मुळात जिथे निवडणुकीत झाली नाही तेथे आम्ही निवडणूक लावू शकलो आणि अवघ्या काही महिन्यांमध्ये आमच्या पॅनलच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली. महाविकास आघाडीला संपूर्ण राज्याने नाकारले आहे. दहा हजार सभासद तुमच्या विरोधात आहेत याचे आत्मचिंतन सत्ताधाऱ्यांनी निश्चित करावे असा टोला त्यांनी लगावला .
या निवडणुकीतील आम्ही आमचा पराभव मान्य केला आहे. पण सह्याद्री साखर कारखान्याची एकच निवडणूक त्यांनी जिंकली म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्य जिंकले असा त्याचा अर्थ होत नाही.सहकाराची निवडणूक राजकीय पद्धतीने कधीही लढवली जात नाही .
भाजपाच्या दोन पॅनलबाबत ते म्हणाले, की जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि संबंधितांच्या पॅनलला आम्ही चर्चा करून २१ पैकी नऊ जागा द्यायची तयारी दर्शवली होती. मात्र त्यांना आपली राजकीय ताकद कराड उत्तर मध्ये मोठी आहे असा विश्वास होता. कदाचित त्यांनी वेगळा विचार केला असेल अशी टिप्पणी घोरपडे यांनी केली .