कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील २१ जागांसाठी कराड, सातारा, कोरेगाव, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा पाच तालुक्यांतील ९९ मतदान केंद्रांवर उद्या शनिवारी (दि. ५) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चुरशीने मतदान होत आहे. कराड तालुक्यातील ४९ गावांत ६८, कोरेगाव तालुक्यात ८ गावांत १५, सातारा तालुक्यातील ५ गावांत ६, खटाव तालुक्यातील ३ गावांत ५ आणि कडेगाव तालुक्यातील ३ गावांत ५ मतदान केंद्रे असणार आहेत.
सह्याद्री कारखान्याचे ३२ हजार २०५ सभासद मतदार असून, निवडणुकीसाठी १ हजार ४० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे. मतदान साहित्य घेऊन सर्व पथके आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाली आहेत. त्यासाठी १८ एसटी बसेस, २ मिनी बस, २१ जीप अशी वाहनेही तैनात आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. तसेच सीसीटीव्ही व व्हिडीओच्या माध्यमातूनही लक्ष राहणार असल्याची माहिती सहकारी संस्था उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांनी दिली आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या सह्याद्री कारखान्यासाठी प्रथमच भाजप आमदाराच्या नेतृत्वाखालील आघाडी टोकदार संघर्षास उतरल्याने सर्वदूर ही निवडणूक गाजत आहे. ‘सह्याद्री’चे अध्यक्ष व माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी विरोधात दोन स्वतंत्र आघाड्या असून, त्यात भाजप नेते व कार्यकर्ते विभागले आहेत.
त्यातील एका आघाडीचे सारथ्य आमदार मनोज घोरपडे हे करीत असून, दुसऱ्या आघाडीचे म्होरके म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आदी कार्यरत आहेत. काँग्रेसही विभागली असून, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील- उंडाळकर यांची रयत संघटना आमदार घोरपडे यांच्यासोबत आहे. तर, न्यायालयाच्या निकालाने नुकताच उमेदवारी अर्ज बाद झाल्याने निवडणूक रिंगणातून बाहेर पडलेले काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात व काही पदाधिकारी, कार्यकर्ते हे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व रामकृष्ण वेताळ यांच्या आघाडीसोबत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अजित पाटील- चिखलीकर, नामदेव पाटील आदी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सोबतीला असल्याने पक्षांतर्गत व गटा-गटांतील हेव्यादाव्यांसह प्रचाराची रणधुमाळी उडाल्याने निवडणूक प्रतिष्ठेची अन् चुरशीची बनली आहे.
तिन्ही आघाड्यांनी जोरदार मोर्चेबांधणी करून, सर्व त्या ताकदीने निवडणूक जिंकायचीच, असा चंग बांधल्याने मतदान आणि निवडणूक निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.