सांगली : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली उद्यान रविवारपासून पर्यटनासाठी खुले करण्यात आले असून याचा शुभारंभ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. सांगली, सातारा जिल्ह्यात विस्तारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय अभयारण्य अलिकडे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. पावसाळी हंगामात पर्यटनासाठी मनाई करण्यात आली होती. आजपासून पर्यटकांना सशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे.
चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात निसर्ग सौंदर्यासोबतच विविध प्रकारचे पक्षी, बिबट्या, गवे, चितळसारखे तृणभक्षी प्राणी, चांदोली धरणाचे पाणी, जनीचा आंबा, पाचगणीचे पठार, झोळंबीचे पुष्प सौंदर्य पाहण्याची संधी मिळणार आहे. यासाठी वन विभागाच्या प्रवेशद्बारापासून १२ किलोमीटर अंतरापर्यंत बसची व्यवस्था करण्यात आली असून दोन बस आहेत. मुलांना २०० रूपये तर प्रौढांना २५० रूपये प्रवेश शुल्क असून शिराळा तालुक्यातील शालेय मुलांना प्रवेश शुल्कामध्ये ७५ टक्के सवलत आहे.
हेही वाचा >>> ताडोबातील ‘रोमा’चा कुटुंब कबिल्यासह ‘रोड शो’, पर्यटकांनी अनुभवला ‘याची देहि याची डोळा’
आमदार नाईक यांच्या हस्ते आज फीत कापून पर्यटनाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी चांदोली विभागाच्या उपसंचालक श्रीमती स्नेहलता पाटील उपस्थितीत होत्या. तालुक्याचे माजी सभापती हणमंत पाटील, सरपंच शोभा माने, चांदोलीचे वन क्षेत्रपाल नंदकुमार नलावडे, ढेबेवाडीचे वन क्षेत्रपाल ज्ञानेडर राक्षे, वनपाल काशीलिंग बादेरी, शिवाजी पाटील, के. पी. सावंत, विजय दाते, सुभाष व प्रकाश पाटील, चांदोली रिसॉर्टचे सुनील चव्हाण, सतीश पाटील व वन विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.