राहाता: शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानला केंद्रीय गृह मंत्रालयाने परकीय चलनातील दान स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. यामुळे २०२१ पासून बंद असलेली सुविधा पुन्हा सुरू झाली आहे.याशिवाय संस्थानच्या तिजोरीत पडून असलेले परकीय चलनही संस्थानला व्यवहारात आणता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय गृह मंत्रालयाने २०२१ मध्ये ऐन करोनाच्या महामारीच्या काळात तांत्रिक बाबीवर साईबाबा संस्थानसह देशातील अनेक प्रमुख देवस्थानांचा परकीय चलन परवाना गोठवला होता. त्यामुळे साईबाबा संस्थान मध्ये ३१ डिसेंबर २०२१ पासून परकीय चलन स्वीकारण्याची सुविधा बंद होती, तरीही भाविक दानपेटीत नोटा, चेक, व तत्सम देणगी स्वरुपात परकीय चलन टाकत होते. यामुळे संस्थांनकडे २०२१ पासून आजवर जवळपास २० कोटींचे परकीय चलन जमा झाले होते.मात्र, हे चलन संस्थांनला व्यवहारात आणता येत नव्हते. २० नोव्हेंबर २०२३ पासून तर संस्थांनने परकीय चलन स्वीकारणेही बंद केले होते. तशा आशयाचे फलकही देणगी कक्षात व मंदिर परिसरात लावण्यात आले होते. साईबाबा संस्थानच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने २०२१ पासून २०२६ पर्यन्त परकीय चलनाचा परवाना नूतनीकरण केला आहे. यामुळे संस्थानकडे यापूर्वी जमा झालेले परकीय चलनही वापरता येणार असल्याचे संस्थानच्या मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे व लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी यांनी सांगितले

शिर्डीत नेहमीच देश-विदेशातील भाविकांची गर्दी असते. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीमुळे संस्थानला परकीय चलनातील देणगी स्वीकृतीचे रजिस्ट्रेशन नूतनीकरण करून मिळाल्याने आता परकीय चलनात देणगी स्वीकारण्याची सुविधा पुन्हा सुरू झाल्याने भाविकांची मोठी सोय होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ही सुविधा सुरू करण्याची अनुमती मिळताच तत्काळ परकीय चलन स्वीकारण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.श्री साईबाबांच्या दर्शनाला येणारे भाविक आता पुन्हा एकदा परकीय चलनातील दान अर्पण करू शकतील. दक्षिणापेटीत दान टाकता येईल, तसेच देणगी काउंटर किंवा ऑनलाईनद्वारेही देणगी देता येईल.