Sanjay Raut on Saif Ali Khan : सैफ अली खानच्या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील जंगलातून त्याला अटक करण्यात आली. त्याने जवळपास ७० तास पोलिसांना गुंगारा दिला. त्याच्या चौकशीतून तो बांगलादेशी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु, यावरून आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार तथा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका केली आहे. या प्रकरणातील आरोपी बांगलादेशी आहे, असा दावा पोलिसांनी केलाय, मात्र हा राजकीय दावा असल्याचं राऊत म्हणाले. ते आज माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “मी अनेक वर्ष पत्रकारिता करतोय. माझी सुरुवात क्राइम रिपोर्टर म्हणून झालीय. त्यामुळे पोलीस खात्यात काय चालतं हे मला माहितेय. सैफ अली खानवर जो हल्ला झाला त्यावर मी आता बोलणार नाही कारण याप्रकरणी तपास सुरू आहे. पण त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपावाले करत असतील किंवा इतर पक्षांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे.

“तपास भाजपा नाही, पोलीस करत आहेत. भाजापने वेगळी एसआयटी तयार केली आहे का? कालपर्यंत सैफ अली खान आणि करीना कपूर लव्ह जिहादचे प्रतिक होते. त्यांच्या मुलाचं नाव तैमुर ठेवल्याने त्या लहान बालकावर हल्ले होत होते, पण आज तुम्हाला पुळका आलाय. यात कसला आलाय आंतरराष्ट्रीय कट? रोहिंगे आणि बांगलादेशी येथे आले असतील तर अमित शाहांनी जबाबादारी घेतली पाहिजे”, असंही संजय राऊत म्हणाले.

पोलिसांचा दावा राजकीय दावा

“पोलिसांचा दावा हा राजकीय दावा आहे. जर बांगलादेशी या मुंबईत घुसले असतील आणि ते अशाप्रकारचे गुन्हे करत असतीलत र याला नरेंद्र मोदींचं सरकार जबाबदार आहेत. दिल्लीत, पश्चिम बंगाल, मुंबईमध्ये बांगलादेशी आहेत. बांगलादेशी चाकू घेतो आणि अत्यंत सुरक्षित असलेल्या सैफ अली खानच्या घरावर हल्ला करतो. हा सर्व प्रकार अत्यंत रहस्यमय आहे. तुम्ही काहीतरी लपवताय आणि त्याचं खापर दुसऱ्या कोणावर तरी फोडताय. त्यामुळे हा भाजपाचा डाव आहे, असं मी म्हणेन”, असं संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan and kareen kapoor was ideal of love jihad once upon a time sanjay raut critisice bjp sgk