Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामुळे देशभरातील त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. यामुळे मुंबईतील कायदा सुव्यवस्थाही धोक्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात जाऊन चोरी करण्याचा प्रयत्न करणे आणि त्याच्यावरच हल्ला करून पसार होणे, ही मुंबईसारख्या शहरातील अनाकलनीय घटना आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात सैफच्या घरातील मदतनीस हिच्याही हाताला जखम झाली आहे. तिलाच आधी घरात कोणीतरी शिरल्याचं कळलं. ती ओरडल्यानंतर सैफ धावून आला, असं तिने पोलिसांना जबाबात सांगितलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“माझ्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर सैफ अली खान उठले. त्यांनी चोराला पाहिल्यावर त्यांच्यात झटापट झाली. या झटापटीत चोराने सैफ यांच्यावर हल्ला केला”, असं या मदतनीसाने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टीमला चौकशीदरम्यान सांगितलं. हल्ल्यानंतर सैफने स्वतः पोलिसांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली. तसंच, सैफच्या मोठा मुलगा इब्राहिमने सैफला लीलावती रुग्णालयात रिक्षाने नेले, असंही तिने सांगितलं. या झटापटीत मदतनीसाच्या हातालाही दुखापत झाली होती. मात्र, तिच्यावर उपचार करून तिला घरी सोडण्यात आले.

तैमूर आणि जेह कुठे होते?

या घटनेच्या वेळी सैफ अली खानची पत्नी करीना कपूर आणि त्यांची मुले तैमूर आणि जेह घरातच होते, असंही तिने पोलिसांना सांगितलं. दरम्यान, हल्ल्याच्या दोन तास आधी क्राइम ब्रँच टीमला सैफ अली खानच्या सोसायटीत प्रवेश करताना दिसला नाही. तो आत्पकालीन पायऱ्यांनी घरात शिरला, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला ओळखले असून त्याच्या तपासासाठी १० पथके तैनात करण्यात आली आहेत.

सैफ अलीच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी काय सांगितलं?

मज्जातंतूतज्ज्ञ डॉ. नितीन डांगे सांगितले की, “मध्यरात्री २ च्या सुमारास सैफ अली खान लीलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी होते. त्यांच्या मणक्यात चाकूचा भाग अडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. शस्त्रक्रिया करून चाकू काढण्यात आला आहे. लिकिंग स्पायनल फ्लुएडवरही उपचार करण्यात आले. डाव्या बाजूला आणि मानेवरील असलेल्या खोल जखमांवर प्लास्टिक सर्जरी टीमकडून उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती आता पूर्णता स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहेत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan attack what domestic help said to mumbai crime branch sgk