संत मुक्ताईची पालखी ६५० कि.मी पायी चालत पंढरीत दाखल

मंदार लोहोकरे

पंढरपूर: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण ठाकुरबुवा समाधी येथे संपन्न झाले.गोल रिंगणाचा नेत्रदीपक सोहळा झाल्या नंतर माउली आणि संत सोपानकाका या दोन भावंडांची भेट पंढरपूर तालुक्यातील टप्पा येथे झाली.तर जगदगुरू तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे मुक्कमी आली.तर जवळपास ६५० किलोमीटरचा पायी प्रवास करून संत मुक्ताईची पालखी पंढरीत दाखल झाली.आता वारकर्यांना सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.

संत ज्ञानेश्वर महराजांची पालखी सोमवारी सकाळी वेळापूरहून मार्गस्थ झाली.पुढे ठाकुरबुवा समाधी येथे माउलींचे पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण पार पडले. येथे माउलीची पालखी दाखल होताच सर्वत्र भगव्या पताका, टाळमृदुंग आणि माउली,माउलीचा जयघोष सुरु होता. माउलीच्या अश्वाने वायुवेगाने तीन फेर्या पूर्ण केल्या.या वेळी ज्ञानोबा माउलीचा जयजयकार,टाळ मृदुंगाचा जयघोष याने आसमंत दुमदुमून निघाला आणि याच वेळी सार्यांचे लक्ष अश्वाच्या धावे कडे लागले होते.अशा या उत्सहात रिंगण सोहळा संपल्यावर माउलीच पालखी सोहळा टप्पा येथे पोहचला.

टप्पा येथे दोन भावंडाच्या भेटीचा भावपूर्ण सोहळा पार पडला.माउलीची पालखी पाठोपाठ संत सोपानकाकांची पालखी देखील टप्पा येथे पोहचली. या वेळी दोन्ही पालखी सोहळ्यातील वारकर्यांनी.माउली माउलीचा जयजयकार, टाळांचा गजर,वारकर्यांचा ठेका अशा भावपूर्ण वातावरणात बंधू भेट झाली. याठिकाणी संत सोपानकाका आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्हीही पालख्यांचे रथ एकमेकांजवळ आले. याठिकाणीच दोन्हीही बंधू असणा-या संताची भेट झाली. प्रथेप्रमाणे दोन्हीही संताच्या मानक-यांना नारळप्रसादांचे वाटप झाले. खिरापत झाली.दोन भावांची भेट आपल्या डोळ्यात साठवून वारकरी भारावून गेले.पुढे दोन्ही संतांची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी पोहचली.उद्या म्हणजे मंगळवारी माउलींची पालखीचे बाजीराव विहीर येथे चौथे गोल तर दुसरे उभे रिंगण होणार आहे.त्या नंतर माउलीची पालखी वाखरी येथे मुक्कामी असणार आहे.दुसरीकडे संत तुकाराम महराजांचा पालखी सोहळा सकाळी बोरगाव येथून मार्गस्थ झाला.पुढे तोंडले बोंडले येथे धावा झाला. आणि नंतर पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामी पोहचली. संत तुकाराम महराजांची पालखी उद्या म्हणजे मंगळवारी सकाळी पिराची कुरोली येथून मार्गस्थ होऊन बाजीराव विहीर येथे उभे रिंगण होणार आहे.त्या नंतर पालखी वाखरी येथे मुक्कमी येणार आहे.

संत मुक्ताईची पालखी पंढरीत दाखल झाली.जवळपास ६५० किलोमीटरचा पायी प्रवास आणि २५ दिवस चालणारा हा सोहळा पंढरीत दाखल झाला.मानाची पहिली पालखी म्हणून मुक्ताईच्या पालखी मानली जाते. देवाला नेवैद्य दाखवण्याचा मान मुक्ताईला आहे. असे असले तरी आता पंढरी पासून काही दूर असलेल्या भाविकांना सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे

Story img Loader