विश्वास पवार, लोकसत्ता
वाई : हरिनामाचा गजर करीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी बरड (ता. फलटण) येथे विसावला. ‘साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक जण वारकऱ्यांच्या सेवेत तल्लीन झाला होता. फलटण-बरड मार्गावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करीत माउलींचे जंगी स्वागत करण्यात आले.
फलटण येथील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा रविवारी बरडच्या दिशेने मार्गस्थ झाला. हरिनामाच्या गजरात नवा उत्साह घेत वारकऱ्यांच्या दिंड्या शिस्तबद्धपणे पुढे जात होत्या. पालखी सोहळ्याने विडणी येथे न्याहारी, पिंपरद येथे दुपारचे भोजन, वाजेगाव आणि निंबळक नाका येथे विश्रांती घेतली. बरड येथील पालखी तळावर सोहळा मुक्कामासाठी विसावला. पंढरपूर मार्गावरील विविध गावांतील व परिसरातील भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
पुणे, सातारा जिल्ह्यातील आपला मुक्काम संपवून विठुरायाच्या सोलापूर जिल्ह्यात सोमवारी (४ जुलै) प्रवेश करणार आहे. शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाच्या भेटीतून आनंदी झालेले व विदर्भ, मराठवाडा, खान्देश व इतर या भागांतून लाखो वारकरी भाविक आपल्याकडे पाऊस पडतो आहे का, याची माहिती घेत होते. मागील काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र अजून पाऊस पडावा असे साकडे वारकऱ्यांनी पांडुरंगाला घातले. पालखी विसावल्यानंतर रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. महसूल विभागाच्या वतीने चोख व्यवस्था केली होती. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्य मुक्कामाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. बरडहून पालखी सोहळा सोमवारी नातेपुते येथे जाणार आहे.