सुधीर जन्नू
बारामती : जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे कवी मोरोपंत आणि श्री शिवलीलामृतकार श्रीधर स्वामी यांची कर्मभूमी असलेल्या बारामती शहरात आगमन झाले. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या गजरात पालखीच्या आगमनाने शहरातील वातावरण भक्तीमय झाले. पाटस रोडवरील देशमुख चौकात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत केले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, एन्व्हायर्नमेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील चौकाचौकात विविध संस्था आणि संघटनांकडून पालखी आणि दिंड्यांच्या स्वागतासाठी मंडप उभारण्यात आले. तसेच सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, अल्पोपहार, फळे, पाणी पुरवठा व इतर सेवा पुरवण्यात आली. दोन वर्षांच्या खंडानंतर पालखीचे दर्शन घेण्याची संधी मिळाल्याने बारामतीकरांनी गर्दी केली.
पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांची स्वच्छता करून निर्मल वारीअंतर्गत शहरात विविध ठिकाणी आठशे सीट फिरते शौचालयाची सोय करण्यात आली. बारामती नगर परिषदेकडून शारदा प्रांगण आणि नगरपरिषद परिसरात वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण,स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा ३.० अंतर्गत शहरात प्लास्टिक मुक्त बारामती, प्रदूषण मुक्त वारी आणि पर्यावरण हरित संतुलनासाठी उपक्रम राबवण्यात आला. पालखी मार्गावर बारामती बँकेच्या कर्मचारी संघ, बुलढाणा अर्बन सोसायटी, प्रगती कलेक्शन यांच्यातर्फे वारकऱ्यांना खाद्यपदार्थ आणि वस्तूंचे वाटप करण्यात आले. या पालखी सोहळ्यात महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान, सांस्कृतिक कार्य संचालनालय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण, बारामती नगर परिषद आदी विभागांच्या चित्ररथातून शासन योजनांची माहिती देण्यात येत आहे.