‘सैराट’मधील दादा पाटील महाविद्यालय प्रसिद्धीच्या झोतात
मराठीत अल्पावधीत विक्रमी गल्ला गोळा करणाऱ्या सैराटच्या निमित्ताने कर्जत शहरातील दादा पाटील महाविद्यालयही प्रकाशझोतात आले आहे. कर्जतकरांच्या दृष्टीने ही कौतुकाची गोष्ट ठरली आहे. या सिनेमातील अर्ची आणि परश्या यांचे प्रेम फुलते, ते येथेच. सैराटमधील अनेक प्रसंग याच महाविद्यालयात चित्रित करण्यात आले आहेत.
या चित्रीकरणानंतर यथावकाश पूर्ण झालेला ‘सैराट’ हा सिनेमा पदापर्णापूर्वीच बहुचर्चित ठरला होता. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीनच दिवसांत या सिनेमाने तब्बल १२ कोटींचा गल्ला गोळा केला. मराठीत हा विक्रम ठरला आहे. या चित्रपटातील दादा पाटील महाविद्यालयाचे नाव तेच दाखवण्यात आले असून, कर्जतऐवजी पुढे ‘बिटरगाव’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या सिनेमाबरोबरच हे महाविद्यालयही प्रकाशझोतात आले आहे.
ग्रामीण भाग असूनही दादा पाटील महाविद्यालयाचे आवार अतिशय देखणे आहे. या सिनेमातील अर्चीची बुलेट मोटारसायकलवरील एन्ट्री गाजली, हे कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाचेच प्रवेशद्वार आहे. या सिनेमातील अनेक प्रसंग याच महाविद्यालयात चित्रित करण्यात आले आहेत. मंग्या आणि परश्याचे भांडण, महाविद्यालयातील वर्ग, परश्याने अर्चीला दिलेले प्रेमपत्र आदी अनेक प्रसंग येथील आहेत. अगदी शेवटचा महिला आमदारांचा सत्कारही दादा पाटील महाविद्यालयातील असून, या प्रसंगाच्या निमित्ताने प्राचार्य डॉ. कांबळे, उपप्राचार्य सुभाष उगले, प्रा. प्रकाश धांडे, प्रा. नितीन धांडे यांच्यासह अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनाही या सिनेमात झळकण्याची संधी मिळाली.

Story img Loader