राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी केले सन्मानित

महाराष्ट्र राज्यात ‘सहकाराचे आदर्श मॉडेल’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या तसेच कोकणात खऱ्या अर्थाने सहकार चळवळ रुजविणाऱ्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रविवारी पुण्यात ‘सहकारनिष्ठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी राज्यपाल के. शंकर नारायणन व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
बालेवाडी येथे सहकार विभागाच्या वतीने रविवारी सहकार पुरस्कार एका समारंभात प्रदान करण्यात आला. दि रायगड जिल्हा मध्यवर्ती सह. बँक ही ‘आयएसओ ९००१’ मानांकन मिळविणारी पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल ५ वेळा वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट बँक पुरस्कार, ५ वेळा युवक पुरस्कार, उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार, उत्कृष्ट जिल्हा बँक असे विविध पुरस्कार बँकेला मिळालेले आहेत.
सर्वोत्तम व्यवस्थापन आणि कर्मचारीवर्ग तसेच कोअर बँकिंग प्रणालीचा अवलंब करणारी पहिली जिल्हा बँक, अशी या बँकेची विविध वैशिष्टय़े आहेत. नाबार्डतर्फे भारतातील निवडक बँकांप्रमाणेच कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी या बँकेची विशेष निवड झाली आहे. त्यासाठी नाबार्डचे चेअरमन डॉ. प्रकाश बक्षी यांनी नुकतीच भेट दिली. आरडीसीसी बँक लवकरच आर. टी. जी. एस., एन. ई. एफ.टी. अशा आधुनिक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांना ‘किसान क्रेडिट कार्ड’ योजनेंतर्गत स्मार्ट कार्ड देण्याची योजना चालू करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. या सर्व गुणांच्या आधारावरच बँकेला आज ‘सहकारनिष्ठ’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दरम्यान, सहकारी क्षेत्राची आगामी दिशा स्पष्ट करण्यासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्याची सूचना राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या समारंभात सहकार विभागास केली.
आंरराष्ट्रीय सहकार वर्षांचा समारोप आणि स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून हा राज्यस्तरीय सहकार पुरस्कार सोहळा बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल के. शंकर नारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कृषीमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, सहकार राज्यमंत्री प्रकाश सोळंके, सहकार खात्याचे सचिव डॉ. सुधीर गोयल, सेक्रेटरी राजगोपाल देवरा, आयुक्त मधुकरराव चौधरी इ. व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, आजच्या काळात आर्थिक शिस्त, योग्य व्यवस्थापन या बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मुळामध्ये या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. तरीपण त्यामध्ये समन्वय आणण्याची गरज आहे. चळवळीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट आवश्यक आहे.
राज्यपाल के. शंकरनारायणन म्हणाले, सहकार चळवळीसमोर स्पर्धेप्रमाणे जागतिकीकरण, खासगीकरणाचे मोठे आव्हान आहे. पण, ग्रामीण भागात चळवळीचे अजूनही महत्त्वपूर्ण स्थान आहे. आर्थिक परिवर्तनास सहकार चळवळीचा फार मोठा वाटा आहे. सध्याच्या काळात शेती हे कायमस्वरूपी उत्पन्नाचे स्रोत नाही. म्हणूनच सहकार चळवळीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ९७ व्या घटना दुरुस्तीमुळे अधिक प्रमाणात पारदर्शकता येणार आहे.
सहकार सचिव राजगोपाल देवरा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सहकार राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी राज्यस्तरीय परिषदेच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांचे ‘सहकार: काल, आज आणि उद्या’ यावर तर अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी यांचे ‘९७ वी घटना दुरुस्ती’ या विषयावर व्याख्यान झाले.