राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षातील अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत वेगळा गट बनवला आहे. तसेच या गटाने आता थेट पक्षाचं अध्यक्षपद, पक्षाचं नाव आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह यावर दावा केला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या गटातील नेते आता शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. प्रामुख्याने अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. भुजबळांच्या टीकेनंतर आज (२९ ऑगस्ट) राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उस्मानाबाद येथे आंदोलन केलं. या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या युवा नेत्या सक्षणा सलगर यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
सक्षणा सलगर म्हणाल्या, आज उस्मानाबाद-धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, युवक काँग्रेसच्या नेतृत्वात आम्ही हे आंदोलन करत आहोत. आम्हाला शरद पवार यांची शिकवण आहे आणि छगन भुजबळ वयस्कर आहेत म्हणून आम्ही त्यांचा एकेरी उल्लेख करणार नाही. परंतु, भुजबळजी सगळेच जण असं करू शकणार नाहीत. तुम्ही युवकांचा आजचा उद्रेक पाहिला असेल. त्यामुळे जरा आब राखून बोला.
सक्षणा सलगर छगन भुजबळांना उद्देशून म्हणाल्या, तुम्ही शरद पवारांना म्हणालात, मी बघून येतो आणि सजून आलात! कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेऊन झुल पांघरून आलात आणि आता शरद पवार यांच्याबद्दल वाट्टेल ते बरळताय. तुम्ही विसरला असाल, तुम्हाला जामीन मिळाल्यावर पहिल्यांदा भेटायला येणारे, जामीन मिळाल्यावर मंत्रीपद देणारे शरद पवार आहेत. मिठाला जरा जागा आणि स्वतःच्या वयाचा आब राखा, नाहीतर महाराष्ट्रातील जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. यासाठीच हे आंदोलन आहे.
सलगर म्हणाल्या, भुजबळ आणि इतर नेत्यांना आम्हाला सांगायचं आहे की शरद पवार यांच्याबद्दल अदबीने बोलायचं. शरद पवारांवर असे बेछूट आरोप आम्ही सहन करणार नाही. तुम्हाला जर कायमचं घरात बसायचं नसेल तर शरद पवारांबद्दल बोलताना अदबीने बोलायचं.
हे ही वाचा >> “मीच राष्ट्रवादीचा अध्यक्ष”, अजित पवारांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “आपल्या देशात…”
सक्षणा सलगर म्हणाल्या, मी बीडच्या जनतेला सलाम करते. अजित पवारांच्या सभेला ते गेले. तिथे शरद पवारांबद्दल बोलताना भुजबळांना खाली बसवलं हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलं आहे. तुम्हाला जर कायमचं घरात बसायचं नसेल तर शरद पवारांबद्दल बोलताना अदबीने बोलायचं.