बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून वेगाने तपासचक्रे फिरवली आणि पाच काही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तापास सुरू असून पोलिसांनी आता धक्कादायक खुलासा केला आहे.
सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींच्या विरुद्ध दाखल केलेल्या नवीन आरोपपत्रामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खानच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने २५ लाखांची सुपारी जाहीर केली होती, असं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आरोपींवर हत्येचा कट रचणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे.
हेही वाचा : परदेशात नोकरीच्या आमिषाने ६० बेरोजगार तरूणांना ३६ लाखांचा गंडा
Maharashtra | Navi Mumbai Police, which is investigating the case of an attempt to murder actor Salman Khan, have filed a chargesheet against five arrested accused of the Lawrence Bishnoi gang in this case. The accused were also preparing to buy AK-47 rifles, AK-92 rifles and…
— ANI (@ANI) July 2, 2024
आरोपपत्रानुसार, बिश्नोई टोळीने सलमान खानच्या हत्येसाठी २५ लाखांची सुपारी दिली होती. ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत अनेक महिन्यांत हा कट आखण्यात आला होता. एवढंच नाही तर या टोळीचा पाकिस्तानकडून एके-४७, एके-९२, एम १६ रायफल्स आणि तुर्की बनावटीच्या झिगाना पिस्तूलसह प्रगत बंदुक मिळविण्याचा इरादा होता, अशी धक्कादायक माहिती समोर आल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येसाठी अशाच प्रकारचे शस्त्र वापरण्यात आले होते, असंही म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लॉरेन्स टोळीच्या ५ आरोपींच्या विरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असून हा कट फक्त शस्त्रे मिळवण्यापुरता मर्यादित नव्हता. तर पाळत ठेवण्याच्यापर्यंत हे नेटवर्क विस्तारलं होतं. आरोपपत्रानुसार, जवळपास ६० ते ७० लोकांचे नेटवर्क सलमान खानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात गुंतले होते. १८ वर्षांखालील मुलांना वापरण्यात आले होते. तसेच हे अल्पवयीन मुले हल्ल्याची सुरुवात करण्यासाठी टोळीतील प्रमुख व्यक्तीच्या आदेशाची वाट पाहत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.