Salman Khan Security महाराष्ट्राच्या गृह विभागाने अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पोलीस अधिकारी सलमान खानच्या घरी पोहोचले आहेत. ५ जून रोजी सलमान याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते, त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


काय आहे धमकीचे प्रकरण?
सलीम खान सकाळी फिरण्यासाठी गेले होते. तिथे ते एका बाकावर बसले असताना त्यांना एक पत्र आढळून आले. या पत्रात त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली होती. ‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ असे या पत्रात लिहण्यात आले होते. हे पत्र वाचल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. गायकाच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी आहे, त्यामुळे सलमानच्या जीवालाही धोका असल्याचे सांगण्यात येत आहे.

सलमानचे आगामी चित्रपट
आयफा अवॉर्ड्स २०२२ साठी अबू धाबीला गेलेला सलमान रविवारीच मुंबईला परतला. सलमान गेल्या काही महिन्यांपासून त्याचा आगामी चित्रपट टायगर ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्याही भूमिका आहेत. एक था टायगर आणि टायगर जिंदा है चा थेट सीक्वल, हा चित्रपट शाहरुख खानच्या पठाणशी जोडला गेला आहे आणि त्यात शाहरुखचा एक कॅमिओ देखील आहे. हा चित्रपट २१ एप्रिल २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

Story img Loader