राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी एक महत्वाची घोषणा केली. मुस्लीम लोकसंख्या अधिक असणाऱ्या भागांमध्ये करोना प्रतिबंधक लस घेण्याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे. त्यामुळेच या भागांमध्ये लस घेण्यासाठी लोक पुढे येताना दिसत नाहीत. म्हणूनच आता राज्य सरकार बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मदत घेणार आहे. सलमानच्या मदतीने या मुस्लीम बहुल परिसरांमध्ये जनजागृती करुन येथील लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा सरकारचा विचार आहे. करोना लसीकरण्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य आहे. मात्र काही भागांमध्ये लसीकरणाचं प्रमाण कमी आहे, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

जालन्यामध्ये सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना टोपे यांनी, “मुस्लीम बहुल परिसरामध्ये अजूनही लसीबद्दल शंका आहे. आम्ही यासाठी आता सलमान खान आणि धर्मगुरुंची मदत घेणार असून मुस्लीम समाजातील सदस्यांनी लसीकरण करुन घेण्यासंदर्भात जनजागृती करणार आहोत,” असं टोपे म्हणाले. धर्मगुरु आणि कलाकार यांचा सर्वसामान्यांवर फार मोठा प्रभाव असतो. त्यामुळेच त्याचं म्हणणं लोक ऐकतील असा विश्वास टोपेंनी व्यक्त केलाय. सलमान खानचा मोठा चाहता वर्ग असून महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा मुस्लीम समाजाची अधिक वस्ती असणाऱ्या भागांमध्ये लसीकरण वाढवण्याचा मदत होईल असा विश्वास सरकारी यंत्रणांना आहे.

तिसऱ्या लाटेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता टोपे यांनी, तज्ज्ञांच्या करोनाच्या लाटेची सायकल ही सात महिन्यांची असते. मात्र मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आल्याने पुढील लाट ही अधिक घातक नसेल. लोकांनी करोनासंदर्भातील नियम पाळले पाहिजेत आणि लसीकरण करुन घेतलं पाहिजे, असंही टोपे म्हणाले.

टोपेंनी घेतली केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट
कोव्हिशिल्डच्या दोन लसमात्रांमधील अंतर कमी करावे, लहान मुला-मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू करावी आणि ‘बुस्टर डोस’ देण्याबाबत विचार केला जावा, अशा तीन महत्त्वाच्या मागण्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांची भेट घेऊन केल्या.

दोन्ही मंत्र्यांच्या २० मिनिटे झालेल्या भेटीमध्ये महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीची माहिती टोपे यांनी मंडाविया यांना दिली. करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये राज्य सरकारने केलेले प्रतिबंधात्मक उपाय व उपचारांच्या कामांचे तसेच, लसीकरणाच्या कामांचे मंडाविया यांनी कौतुक केले. मुंबईमध्ये पहिल्या मात्रेचे १०० टक्के लसीकरण झाल्याबद्दल मंडावियांनी अभिनंदन केल्याचे टोपे म्हणाले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कार वाटप सोहळ्यात सहभागी होण्यासाठी टोपे दिल्लीत आले होते.