कुख्यात गुंड सल्या चेप्या ऊर्फ सलीम महंमद शेख यास मोक्का कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात पोलिसांनी येथील कार्वेनाका परिसरातील घरातून अटक केली. सशस्त्र पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. दरम्यान, अटक केलेल्या सल्याला पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयात पोलिसांकडून हजर केले असता त्यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वी सल्यावर झालेल्या गोळीबारात जायबंदी झाल्याने तो झोपूनच असल्याने त्यास खुर्चीतून उचलून नेत अटकेची कारवाई करण्यात आली.
कुख्यात गुंड सल्या चेप्या याच्या टोळीवर संघटितपणे केलेले विविध गुन्हे सातारा व सांगली जिल्ह्यात दाखल आहेत. सुमारे २ महिन्यांपूर्वी येथील बबलू माने व गुंड बाबर खान या दोघांचा खून झाला होता. बाबर खान हा सलीम शेखचा साथीदार होता. खान व माने यांच्या खुनाच्या घटनेनंतर संघटित गुन्हेगारी अगदीच फोफावल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी निर्मूलन कायदा (मोक्का) अन्वये कारवाईचा बडगा उगारला. मोक्का अन्वये गुन्हा नोंद करून सल्या चेप्याच्या टोळीवर कारवाई सुरू केली. मोक्काअंतर्गत केलेल्या कारवाईत पोलिसांनी सल्याचे साथीदार फिरोज बशीर कागदी ऊर्फ मिस्त्री, सल्याचा मेहुणा इब्राहिम गफूर सय्यद, मोहसीन हारूण इनामदार, सल्याचा मुलगा आसिम सलीम शेख यांना कारागृहातून अटक केली. पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या पथकाने कारवाईचा धडाका लावत सध्या गुन्हेगारी जगताला वेसण घालण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. परिणामी, गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा