Ramdan and Holi on the Same Day : देशभर सर्वत्र होळी आणि रमजान ईदचा उत्साह आहे. होळी (धुलिवंदन) आणि रमजान ईद यंदा शुक्रवारी आल्याने देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. कुठेही समाजविघातक घटना घडू नयेत, दोन्ही समाजातील नागरिकांनी एकोप्याने त्यांचे सण साजरे करावेत याकरता प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांकडून आवाहन आणि सूचना केल्या जात असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून अनेक ठिकाणी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनीही दोन्ही समाजातील नागरिकांना आवाहन केलं आहे. त्यांनी आज व्हिडिओ पोस्ट करून देशातील सलोखा जपून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
व्हिडिओमध्ये अबू आझमी म्हणाले, नमाज इस्लाममध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही नमाज मस्जिदमध्ये जाऊन अदा करा किंवा घरातही अदा केला जाऊ शकतो. पण जुम्माचा नमाज मस्जिदमध्येच अदा केला जातो, घरात नाही. १४ मार्चला रमजान आणि होळीही आहे. जे लोक वर्षभर कमीवेळा नमाज अदा करतात किंवा एकदाही करत नाहीत तेही मोठ्या प्रमाणात या दिवशी नमाज अदा करतात.”
“रमजानला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी हिंदू बांधवांना विनंती करतो की तुम्ही जाणीवपूर्वक कोणावरही रंग टाकू नका. मुस्लिम बांधवांनाही माझी विनंती आहे की, त्यांचाही सण आहे, तुमच्यावर कोणी रंगा टाकला तरीही संयम बाळगा, रमजानचा महिना आहे. कोणताही वाद घालू नका. मस्जिदमध्ये जाऊन नमाज अदा करा आणि थेट घरी जा. या देशात सलोखा टिकून राहू देत. कोणतेही वाद विवाद होऊ नयेत”, असं आवाहन आबू आझमी यांनी केलं आहे.
रमज़ान में जुम्मा और होली का त्यौहार साथ आ रहे है। मेरा बिरादराने वतन मेरे हिंदू भाइयों से निवेदन है कि किसी को छेड़ने के लिए उनपर रंग ना डालें और मुस्लिम भाइयों से गुजारिश है अगर कही कोई आप पर रंग डालता भी है तो सब्र कीजिए। हमारी हमेशा कोशिश होनी चाहिए कि आपसी भाईचारगी बढ़े और… pic.twitter.com/9WNoYK0b8i
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) March 13, 2025
मुंबईत पोलिसांकडून नियमावली जारी
दरम्यान, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, धुलीवंदनानिमित्त १२ ते १८ मार्चदरम्यान सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी गाणे, अश्लील इशारे करणे आणि रस्त्यावर चालणाऱ्या लोकांवर रंगांनी भरलेले फुगे फेकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी जारी केलेल्या आदेशात तसे स्पष्ट करण्यात आले आहे. धुलीवंदनानिमित्त सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी, रंग फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय जातीय तणाव व सार्वजनिक शांतता भंग होईल, असे कृत्य करू नये, असेही नमुद करण्यात आले आहे.
अबू आझमींवरील प्रकरण मरिन ड्राईव्ह पोलिसांकडे
तर, मुघल बादशाह औरंगजेबबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी बुधवारी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आले होते. आझमी यांना सत्र न्यायालयाने मंगळवारी अटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आझमी बुधवारी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आले होते. औरंगजेबाची स्तुती केल्याने हिंदूंच्या भावना दुखावणे, तसेच सत्ताधारी पक्ष मुस्लिम धर्मियांना बरबाद करत असल्याचे विधान करून हिंदू- मुस्लिम धर्मियांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा पुढील तपासासाठी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.