उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला वगळून समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात आघाडी होण्याची शक्यता असताना समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी काँग्रेसने महाआघाडीसाठी पुढाकार घ्यावा, असे विधान केले आहे. प्रकाश आंबेडकर हे एमआयएमला ‘हात’ दाखवून काँग्रेससोबत जातील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
औरंगाबादमध्ये अबू आझमी यांनी महाआघाडीबाबत भाष्य केले. महाराष्ट्रासह देशातही समविचारी, संविधानाला मानणाऱ्या पक्षांची महाआघाडी होणे आवश्यक असून, त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. भाजपाचा पराभव करण्यासाठी महाआघाडी गरजेची असल्याचे त्यांनी नमूद केले.
दोन ते तीन दिवसांतच प्रकाश आंबेडकर हे एमआयएमला सोडून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतील, असा दावा त्यांनी केला. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी व इतर पक्षांतील फुटीर नगरसेवकांच्या बळावर भाजपाने महापालिकेत सत्ता हस्तगत केली. फुटीर नगरसेवक ही केवळ राष्ट्रवादीचीच नव्हे तर सर्वच पक्षांची डोकेदुखी ठरत असून, यावर कडक कायदा करण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
मुस्लीम समाजातील स्त्रियांच्या प्रश्नाशी संबंधित तीन तलाक कायदा करण्यामागे मोदी सरकारचा हिंदू व मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण व्हावे, असा उद्देश असल्याचा आरोप केला. देशात भगवा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी तर मुस्लीम समाजातील युवकांना दंगलीसारख्या घटनांमध्ये गोवण्याचे षडयंत्र चालल्याचा आरोप आझमी यांनी केला.
मुलायमसिंग, अखिलेश यांची सभा
औरंगाबादेतील आमखास मदानावर येत्या ९ फेब्रुवारी रोजी समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव व अखिलेश यादव यांची संयुक्तरीत्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याचे आझमी यांनी सांगितले. महाराष्ट्रात समाजवादी पार्टी महाआघाडी व्हावी, यासाठी मनसेला वगळून इतर पक्षांसोबत जागांच्या अटींबाबत ताठर भूमिका घेणार नसल्याचेही आझमी यांनी स्पष्ट केले.