मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो, पण देशातील कोणताही सच्चा मुसलमान कधीही ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही, मग मला देशातून बाहेर काढले तरी चालेल असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केले. अबू आझमींच्या विधानावर शिवसेनेने प्रत्युत्तर दिले असून ‘वंदे मातरम्’ला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे असे दिवाकर रावतेंनी म्हटले आहे.
मद्रास हायकोर्टाने दोन दिवसांपूर्वी प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये ‘वंदे मातरम्’ म्हणणे बंधनकारक केले होते. या निर्णयावरुन आता राजकारण सुरु झाले असून अबू आझमी यांनी बेताल विधान करुन नवीन वादाला तोंड फोडले. आम्हाला देशातून बाहेर काढले तरी चालेल, पण देशातील खरा मुसलमान कधीच ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही. माझा धर्म मला ‘वंदे मातरम्’ म्हणण्याची परवानगी देत नाही. मग माझ्यावर कारवाई करा किंवा तुरुंगात टाका असे आव्हानच आझमींनी दिले.
एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनीही ‘वंदे मातरम्’च्या सक्तीला विरोध दर्शवला होता. माझा धर्म, कायदा आणि संविधान मला याची परवानगी देत नाही. माझ्या गळ्यावर कोणी चाकू ठेवला तरी मी ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही. सक्तीचा प्रयत्न झाला तर आम्ही त्याला विरोध करु असे पठाण यांनी म्हटले होते.
अबू आझमी आणि वारिस पठाण यांच्यानंतर शिवसेनेनेही या वादात उडी घेतली. गळ्यावर चाकू ठेवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. पण जर एवढी लाज वाटत असेल तर त्यांनी देश सोडून जायला पाहिजे. ही आमची मातृभूमी असून या भूमीला स्वतंत्र करणारे ते गीत आहे. या गीताचा आदर करण्याचा त्रास असल्यास तुम्ही इथून निघून जाव असे दिवाकर रावतेंनी म्हटले आहे. ही मंडळी इथे राहतात, पण मनाने पाकिस्तानी आहेत असे रावतेंनी म्हटले आहे.