MLA Abu Azmi on Nagpur violence: औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या मागणीसाठी नागपूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चानंतर दोन गटात हिंसाचार उसळला. या हिंसाचारात अनेक पोलीस आणि सामान्य नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. सदर हिंसाचार सुनियोजित पद्धतीने घडवून आणला अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सदर हिंसाचाराची माहिती सभागृहात दिली. यानंतर विविध पक्षांचे नेते शांततेचे आवाहन करत आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे.

आमदार अबू आझमी यांना काही दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते. औरंगजेब हा उत्तम शासक होता, अशी मांडणी करून त्यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केले, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे त्यांचे अधिवेशन कालावधीपुरते निलंबन केले गेले. यानंतर त्यांनी त्यांच्या विधानावरून दिलगिरीही व्यक्त केली. आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला, असेही ते म्हणाले.

आता नागपूर दंगलीबाबत त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटले, “नागपूरमध्ये यापूर्वी कधीही सांप्रदायिक तणाव निर्माण झाला नव्हता. तिथे आपापसात बंधूभाव होता. पण त्याच नागपूरमध्ये एवढी मोठी दंगल झाली, हे ऐकून दुःख झाले. अनेक लोक या दंगलीत जखमी झाले. मी एवढेच म्हणेण की, आपल्या देशात गंगा-जमुनी तेहजीब आहे. रमजानचा महिना आहे, कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. हिंदू आणि मुस्लीम बांधवांना आवाहन करतो की, त्यांनी शांतता राखावी. देशाला पुढे न्यायचे असेल तर सर्वांनी शांतता राखावी. कायद्याला त्याचे काम करू द्यावे.”

एमआयएम पक्षाचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. संसदेच्या बाहेर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे काही मंत्री चिथावणीखोर विधाने देत आहेत. सत्तेतील लोकच जर भडकाऊ विधाने करत असतील तर हे दुर्दैवी आहे.

“कोणत्यातरी मुघल शासकाची प्रतिमा संपूर्ण राज्यात जाळली गेली, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. मग त्यांनी नागपूर येथे कापडावर लिहिलेला कुराणमधील मजकूर जाळला. हे होत असताना मुस्लीम बांधवानी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पण त्यावर कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. त्यानंतर सायंकाळी तिथे दंगल उसळली. मी या दंगलीचा निषेध करतो. पण दंगलीच्या मागची पार्श्वभूमीही तपासून पाहिली पाहिजे”, असेही खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

Story img Loader