शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या चर्चा सुरू असताना अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांचा मोठा गट आपल्याबरोबर घेऊन सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शिंदे गट, भाजपा आणि अजित पवार गटात पालकमंत्रीपदावरून संघर्ष पाहायला मिळत होता. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (४ सप्टेंबर) राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली. या सुधारित यादीनुसार वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. दरम्यान, यावर हसन मुश्रीफांचे राजकीय विरोधक समरजीत घाटगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कागलमध्ये घाटगे कुटुंब विरुद्ध हसन मुश्रीफ असा राजकीय संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर यावर समरजीत घाटगे यांची काय प्रतिक्रिया असेल याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, काही वेळापूर्वी समरजीत घाटगे यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी समरजीत घाटगे म्हणाले, मुश्रीफ पालकमंत्री झाले असले तरी कागलमध्ये आमचा संघर्ष अटळ आहे.

नवनियुक्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं अभिनंदन करून समरजीत घाटगे म्हणाले, कोल्हापुरात मनमानी कारभार चालणार नाही. भाजपाच्या मेहरबानीने पालकमंत्रीपद मिळालं आहे. त्यामुळे भाजपाच्या चौकटीत राहूनच त्यांनी काम करावं. ती चौकट पार करण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा जेव्हा मुश्रीफ ती चौकट पार करतील, तेव्हा जिल्ह्यात मी त्यांच्यासमोर उभा राहीन. त्यांना चौकटीत ठेवायचं काम समरजीत घाटगे भाजपातर्फे करणार हे मी स्पष्ट सांगतो.

हे ही वाचा >> “हा आहे माझ्या लंडन दौऱ्याचा खर्च, आता…”, उदय सामंत यांच्याकडून हिशोब मांडत विरोधकांना उत्तर

भाजपा नेते समरजीत घाटगे म्हणाले, पालकमंत्रीपद तर सोडाच, कागलमधील त्यांच्या आणि माझ्या संघर्षाचा जो विषय आहे तो तर अटळ आहे. मुश्रीफ मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही. त्यांचा आणि माझा संघर्ष अटळ आहे. कागलचं स्वराज्य होणं अटळ आहे. माझ्या गुरूने दिलेला आशीर्वाद हेच माझ्यासाठी पद आणि हीच माझ्यासाठी सत्ता आहे. तर काही लोक असे आहेत ज्यांनी सत्ता आणि पदासाठी चक्क गुरू बदलला आहे. त्यामुळे गुरुच्या आशीर्वादाची ताकद कागल मतदारसंघ त्यांना दाखवून देईल. त्यासाठी मी आणखी जोमाने काम करेन. शेवटी मी इतकंच सांगेन की, संघर्ष जितना बडा होगा, जीत उतनीही शानदार होगी!

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarjeet ghatge told hasan mushrif arbitrariness will not tolerated in kolhapur asc
First published on: 05-10-2023 at 14:24 IST