शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे हे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यात आगमन होताना त्या धारकऱ्यांसह या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले संभाजी भिडे?

“आपल्याला १५ ऑगस्टला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री आणि हणगं स्वातंत्र्य आहे. ते जमत नाही. स्वातंत्र्य म्हणजे हिंदवी स्वातंत्र्य. भगवा झेंडा घेऊन आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला पाहिजे. जिथे जिथे सूर्य उगवतो तिथे तिथे भगवा झेंडा घेऊन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे.” असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं. आता यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संभाजी भिडेंना नोटीस

संत ज्ञानेश्वर महाराज तसंच संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांबरोबर धारकरी पालखीत सहभागी होतात. याआधी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडेंनी देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यावेळी शिवप्रतिष्ठान अध्यक्ष संभाजी भिडे यांना आषाढी वारीत सहभागी होण्यावर निर्बंध नसले, तरी त्यांना पुणे पोलिसांनी वारीत सहभागी होण्यापूर्वी नोटीस दिली आहे. पालखी दर्शनावेळी कायदा-सुव्यवस्थेची काळजी घ्यावी, अशी सूचना भिडे यांना देण्यात आली.

हे पण वाचा- वट सावित्रीच्या पूजेला नट्यांनी आणि ड्रेस घातलेल्या बायकांनी जाऊ नये, संभाजी भिडे यांचे वादग्रस्त विधान

सुवर्ण सिंहासनाचा पुन्हा उल्लेख

“वारकरी धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. आपल्याला रायगडावर सुवर्ण सिंहासन स्थापन करायचं आहे. गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या सात मातांच्या संरक्षणासाठी वाट्टेल ते करायला तयार असणं म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या व्रताची पथ्यं आहेत. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, अशा १०-१० हजारांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणार आहेत. तसंच प्रत्येक तालुक्यात आपल्याला १० हजार तरुणांची तुकडी करायची आहे. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेले लोक आपल्याला तयार करायचे आहेत.” असंही संभाजी भिडे म्हणाले.

संभाजी भिडे कोण आहेत?

संभाजी भिडे सांगलीत राहतात. त्यांचं वय ८५ वर्षांहून अधिक आहे. त्यांचं मूळ नाव मनोहर भिडे हे आहे. तर सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे. १९८० च्या दशकात संभाजी भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. मात्र पुढे त्यांनी संघापासून फारकत घेतली. ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ ही संघटना स्थापन केली. देशात बाबरी आणि श्रीराम मंदिराचा वाद उफाळला होता तेव्हा या संघटनेने जोर धरला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास संभाजी भिडे सांगत असतात. त्यांना भिडे गुरुजी असंही संबोधलं जातं.

संभाजी भिडे यांचा संकल्प काय?

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड या किल्ल्यावर ३२ मण वजनाच्या सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प सोडला आहे. तसंच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार शिवराज्याभिषेक दिन, छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास, दुर्गामाता दौड, धारातीर्थ यात्रा असे विविध उपक्रम या संघटनेतर्फे चालवले जातात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji bhide controversial statement about india independence what did he say scj