सांगली : हिंदूंना शत्रू कोण आणि मित्र कोण हे कळत नाही. जगातील महामूर्ख जमात म्हणजे हिंदू. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे आता ‘इव्हेंट’ झाले असून ते हिंदू समाजाला नामर्द बनवत आहेत, असे मत ‘शिवप्रतिष्ठान युवा’चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केले.

नवरात्रोत्सवानिमित्त सांगली शहरासह विविध ठिकाणी शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गा दौड काढण्यात येते. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून दुर्गा दौडीला प्रेरणामंत्र म्हणून प्रारंभ करण्यात आला. सर्वांत पुढे भगवा ध्वजधारी युवक तर त्या मागे अनवाणी हजारो धारकरी सहभागी झाले होते. माधवनगर रस्त्यावर दुर्गामाता मंदिर येथे देवीची आरती झाली. या वेळी भिडे गुरुजी यांनी उपस्थित धारकऱ्यांना संबोधित केले.

हेही वाचा >>> महत्वाची बातमी! युनेस्कोच्या पथकाकडून किल्ले रायगडाची पाहणी…

भिडे गुरुजी म्हणाले, की शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचे नेतृत्व करण्याचा मार्ग शिकवला. पण सध्या हा धर्म निद्रिस्त झाला आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचे ‘इव्हेंट’ झाले असून यातील प्रकार हिंदू समाजाला नामर्द बनवत चालला आहे. हिंदू-मुस्लिम भाई भाई, हिंदूंना शत्रू कोण, मित्र कोण; वाईट कोण, चांगलं कोण हे कळत नाही. यातून बाहेर पडायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा भारत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत.

हजारो तरुण सहभागी दुर्गामाता दौड छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन महापालिका, राजवाडा चौक, पटेल चौक, कॉलेज कार्नर या मार्गावरून दुर्गामाता मंदिर या मार्गावर काढण्यात आली. या दौडीमध्ये हणंमत पवार, बापू हरिदास, प्रदीप साबने, सिध्दार्थ पेंडुरकर, मिलिंद तानवडे, राहुल बोळाज, राहुल घोरपडे, अविनाश सावंत आदी पदाधिकाऱ्यांसह हजारो तरुण सहभागी झाले होते.