Sambhaji Bhide : कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचलं. त्यानंतर एकच वाद निर्माण झाला. विरोधकांनी कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं म्हणत हा मुद्दा अधिवेशनातही उपस्थित केला. दरम्यान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) यांनी कामरा प्रकरणावर भाष्य केलं आहे.

काय आहे हे प्रकरण?

रविवारी (२३ मार्च) कुणाल कामराने एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार सुधा मूर्ती, व्यावसायिक मुकेश अंबानी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या सगळ्यांची खिल्ली उडवली. तसंच काही विडंबनात्मक गाणीही म्हटली. यावरुन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आक्रमक झाले. दरम्यान कुणाल कामरावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र विरोधकांनी हा मुद्दा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे असं म्हटलं आहे. कुणाल कामराला आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे यांच्यासह जवळपास सगळ्याच विरोधकांनी समर्थन दिलं. अधिवेशनातही हा मुद्दा आणला गेला. त्यावरुन आता संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) आक्रमक झाले आहेत.

संभाजी भिडे यांनी काय म्हटलं आहे?

कुणाल कामरा प्रकरणावरून विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणला. सभागृहाच्या कामकाजाचा महत्त्वाचा वेळ हा या प्रकरणावर गेला. त्यावरून संभाजी भिडेंनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “कुणाल कामरा हा जो नादानपणा सुरू आहे आणि त्यावरून विधानसभेत जो धुडगूस सुरू आहे तो काही लोकशाहीला शोभणारा नाही. मी कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही, पण ज्यांनी ज्यांनी हा नीचपणा केलाय ते सगळे देशद्रोही आहेत असं माझं मत आहे. आमचे आर. आर. आबा होते त्यांची हिंमत अलौकिक होती. त्यांनी डान्स बार बंद केले. कामरा नावाच्या पद्धतीचं हॉटेलं चालवणं म्हणजे डान्स बारचं सावत्र भावंड आहे. ” असंही संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) यांनी म्हटलं आहे.

कुणाल कामराला मुंबई पोलिसांचं दुसरं समन्स

दरम्यान कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दुसरं समन्स बजावलं आहे. मंगळवारी त्याला समन्स बजावण्यात आलं तेव्हा तो सकाळी ११ वाजता चौकशीसाठी मुंबईत हजर राहिला नाही. आता त्याला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. तसंच यावेळी त्याला कुठलीही मुदतवाढ दिली गेलेली नाही. जर कुणाल कामरा पुन्हा चौकशीसाठी हजर राहिला नाही तर काय होणार? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.