शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाब कमी झाल्याचा (Low BP) त्रास होत असल्याने त्यांना महाड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती प्राथमिक सूत्रांकडून समोर आली आहे. संध्याकाळच्या सुमारास त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असू त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. संभाजी भिडे पुण्याला गेले होते, तिथून रायगडकडे येताना त्यांना अचानक त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
संभाजी भिडे यांच्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सभा असतात त्याच धावपळीमुळे त्यांना हा त्रास झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. ‘न्यूज १८ लोकमत’ या वाहिनीने हे वृत्त दिले आहे. दरम्यान जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवप्रतिष्ठानकडून सांगलीमध्ये निषेध करण्यात आला. राज्यकर्त्यांच्या निष्क्रियतेमुळेच देशावर आक्रमणं होत आहेत. तर देशाचे शत्रू देशातच फोफावत असल्याचंही यावेळी संभाजी भिडे म्हणाले होते. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या रक्तगटाची पिढी निर्माण व्हावी ही काळाची गरज आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं होतं.