संभाजी भिडेंच्या अटकेचा मुद्दा आम्ही सभागृहात उपस्थित करण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केला. मात्र विधानसभा अध्यक्षांनी ती चर्चा यशस्वी होऊ दिली नाही. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसंच संभाजी भिडे यांनी काय आरोप केले आहेत ते देखील आव्हाड यांनी सांगितलं. संभाजी भिडेंना राजाश्रय दिला जातो आहे त्यामुळे ते काहीही बोलत आहेत असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
महात्मा गांधी यांचे वडील मुसलमान होते, म्हणून महात्मा गांधी हे मुसलमान धार्जिणे होते असा एक नवीन शोध संभाजी भिडेंनी लावला. महात्मा गांधींना इंग्लंडला शिकायला पाठवलं ते त्यांच्या मुसलमान पालकांनीच अशा प्रकारचंही वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं. साईबाबांबद्दल संभाजी भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं. साईबाबांना हिंदू धर्म देव्हाऱ्यात ठेवून पुजतो त्या साईबाबाची लायकी काय? आधी त्या साईबाबाला देव्हाऱ्यातून बाहेर फेका. मी काही डोकं सटकलेला माणूस नाही. हिंदूंनी साईबाबांना देव मानू नका असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
संभाजी भिडेंनी महात्मा फुलेंविषयीही केलं वादग्रस्त विधान
संभाजी भिडेंनी महात्मा फुलेंविषयीही वादग्रस्त विधान केलं. इंग्रजांनी ज्या समाज सुधारक भ***ना पदव्या बहाल केल्या त्या यादीत महात्मा फुलेंचंही नाव आहे. इंग्रजांनी भारतीयांना राज्य कसे मिळवायचे यासाठी सुधारक नावाची जात तयार केली. निवडक लोकांना पदव्या देऊन तुमचेच वैरी तुमच्यावर सोडले. त्यात उत्तर प्रदेशचे भारत प्रकाश मिश्रा, बंगालचे राजा राममोहन रॉय, तामिळनाडूतले रामस्वामी नायकन आणि महाराष्ट्रातले महात्मा फुले यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या सगळ्यांच्या ढुं*^*वर देशद्रोहाचे शिक्के आहेत असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
हिंदुस्थान हा बेशरम लोकांचा देश आहे असं संभाजी भिडे म्हणाले-आव्हाड
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला तिरंगा फडकणवार नाही असा निर्णय संभाजी भिडेंनी जाहीर केला आहे. तिरंगा फडकवायचा नाही, राष्ट्रगीत म्हणायचं नाही. १५ ऑगस्ट या दिवशी देशाची फाळणी झाली तो स्वातंत्र्य दिवस असू शकत नाही. त्याऐवजी सगळ्यांनी उपवास करावा असं संभाजी भिडे यांचं मत आहे. देशाबद्दल संभाजी भिडे म्हणाले की जगात १८७ राष्ट्रं आहेत. त्या राष्ट्रांमध्ये पारतंत्र्य, परदास्य, गुलामी आणि बेशरमपणे जगणारा १ अब्ज २३ कोटी लोकांचा देश जगात आहे. दीर्घकाळ परिकयांचा मार खात, खरकटं उष्ट खात जगणारा देश म्हणजे हिंदुस्थान असं ते म्हणतात. हे महात्मा गांधी, पंडित नेहरु, राजा राममोहन रॉय या सगळ्यांना हे देशद्रोही म्हणतात. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन नाही. तसंच आपला देश बेशरम लोकांचा देश आहे असं जेव्हा हा संभाजी म्हणतो तेव्हा हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लागू होतं.
संभाजी भिडेंचा आव्हाडांकडून एकेरी उल्लेख
भिडे गुरुजीची गुरुजी ही पदवी आली कुठून? हाऊसमध्येही म्हटलं जातं भिडे गुरुजी. हा गुरुजी ११ वी पास नाही. फर्ग्युसन महाविद्यालयात तो कधी गेला नाही. ऑटोमिक का काय सांगितलं जातं तो विषय कॉलेजात शिकवलाही जात नव्हता. तेव्हा अशा या भिडेचं काय करायचं ते आता महाराष्ट्रानेच ठरवलं पाहिजे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
साईबाबा, महात्मा गांधी यांच्याविषयीचं संभाजी भिडेचं पूर्ण विधान मी सांगितलं नाही. पण अशा प्रकारचा एक वेडा माणूस महाराष्ट्रभर फिरतो आणि त्याला साधी अटकही केली जात नाही. हे सगळं का आणि कशासाठी केलं जातं आहे ते महाराष्ट्राला समजत असेल. जे काही चाललं आहे ते योग्य नाही असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.