गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली असून राज्य सरकारकडून यासंदर्भात चर्चा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हा मुद्दा राजकीयदृष्ट्या तापू लागला आहे. त्यावरून विरोधकांकडूनही राज्य सरकारला लक्ष्य केलं जात असतानाच शिवप्रतिष्ठानचं संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची थेट आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तसेच, सरकारकडून आश्वासनाची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी माझी आहे, असंही त्यांनी जरांगे पाटलांना सांगितलं.
काय म्हणाले संभाजी भिडे?
मंत्री संदीपान भुमरे व अर्जुन खोतकर मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारच्या वतीने चर्चा करण्यासाठी पोहोचले असतानाच संभाजी भिडेही तिथे दाखल झाले. त्यांनी मनोज पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. “मी काही राजकारणी नाही. ज्याला काही कळत नाही, असा मूर्ख माणूस म्हणजे मी. फक्त देव-देश-धर्मासाठी काम करणारे शिवप्रिष्ठानचे लक्षावधी तरुण मुलं, आम्ही सगळे ही समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत आहेत. मागे वळून तुम्ही बघायचंच नाही की आपल्या पाठिशी कोण आहे”, असं संभाजी भिडे यावेळी म्हणाले.
“अजित पवार राष्ट्रवादीचे असले तरी…”
“मराठा समाजाला जसं पाहिजे तसं आरक्षण मिळालंच पाहिजे या निश्चयानं आम्ही तुमच्या पाठिशी उभे आहोत. तुम्ही जे करताय ते योग्य आहे. एक चांगली गोष्ट आहे. आत्ता सत्तेत असणारे एकनाथ शिंदे अजिबात लबाडी करत नाहीत. देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत. अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले, तरी काळजी करणारा माणूस आहे. माझं असं मत आहे की आपण हे आंदोलन जिवाच्या आकांतानं तुम्ही चालवत आहात. तुमच्या तपश्चर्येला यश मिळणार. उगीच ते राजकारणी आहेत म्हणून भीती बाळगू नका. आणि ते शब्द देतील तो त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचं काम माझ्याकडे लागलं”, असं आश्वासन यावेळी संभाजी भिडेंनी मनोज जरांगेंना दिलं.
“ही लढाई एक घाव दोन तुकडे अशी नाही”
“ही लढाई आहे. झट की पट एक घाव दोन तुकडे अशी नाही. पण तुमच्या बाजूने ही लढाई यशस्वी होणार आहे. पण तुम्ही हे उपोषण थांबवावं. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही आमचे प्रमुख आहात. मराठा समाज हिंदुस्थानच्या पाठिचा कणा आहे. तु्म्ही उपोषण थांबवा, लढा नाही. मला काल रात्री १२.४० ला असं वाटलं की मनोज जरांगेंना आपण जाऊ सांगुयात की आम्ही तुमच्याबरोबर आहोत”, असं संभाजी भिडे मनोज जरांगेंना म्हणाले.