Sambhaji Bhide on Dhananjay Munde: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड आज पाहायला मिळाली. संतोष देशमुख यांना मारहाण होत असल्याचे फोटो काल (३ मार्च) व्हायरल झाल्यानंतर आज कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. विरोधकांसह अनेकांनी राजीनाम्याचे स्वागत केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आज पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सुरुवातीला त्यांनी हा राजकीय विषय असल्याचे सांगून बोलणे टाळले. त्यानंतर ते म्हणाले, “दुर्दैव असे की, धनंजय मुंडे आणि इतर राज्यकर्ते जे काही वागत आहेत. ते बरोबर नाही. सर्व राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र आणि मराठ्यांचा इतिहास बारकाईने वाचला पाहिजे.”
संभाजी भिडे पुढे म्हणाले की, या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल तर पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास उभ्या देशात दहावीपर्यंत सक्तीचा केला पाहिजे. मग कुठल्याही भाषेचे विद्यार्थी असोत. देश टिकवायचा असेल तर संस्कृत भाषा शिकवली गेली पाहिजे. पण ही करायची इच्छा उत्पन्न होईल, असे महाराष्ट्राचे शासनही असले पाहिजे.
मराठे स्वतःला संकुचित करून घेत आहेत
“शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळेच आज महाराष्ट्रासह संबंध देश दिसत आहे. ‘महाराष्ट्र मेला, तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले’, मराठे आरक्षण मागून स्वतःला संकुचित करून घेत आहेत. मराठ्यांनी आरक्षण मागायचे नसते, मराठ्यांनी देश चालवायचा असतो. संबंध देशाचा संसार चालविण्याचा समाज कुठे असेल तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे. पण मराठ्यांना आपण कोण आहोत? हे कळत नाही, हे दुर्दैव आहे”, असेही संभाजी भिडे म्हणाले.