हिंदू स्त्री आणि पुरुष हे विविध क्षेत्रात यशस्वी असतील. पण राष्ट्रीयत्वाच्या कसोटीत ते अनुत्तीर्ण आहेत. त्यांच्यात राष्ट्रीयत्वाच्या पेशीच नाहीत. हिंदूच्या रक्तात राष्ट्रीयत्वाच्या जाणीवा पेटत्या नसतात. ते या बाबतीत नपुंसक आहेत, असे वादग्रस्त विधान शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केले आहे. जळगाव येथील एका सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ‘३२ मण सिंहासन व खडा पहारा’ या विषयावर भिडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदू स्त्री आणि पुरुष अनेक ठिकाणी आपला झेंडा रोवतात. आपल्या कार्याचा ठसा उमटवतात. पण राष्ट्रीयत्वाची गोष्ट येते, तेव्हा मात्र हे हिंदू स्त्री-पुरुष नपुंसक ठरतात. मी हे असे निषिद्ध बोलतोय हे मला मान्य आहे. पण ही गोष्ट तितकीच तीव्र आहे. हिंदू स्त्री-पुरूष आपली जमीन, परंपरा, संस्कृती, धर्म या सर्व गोष्टींबद्दल क्रियाशील असतात. पण राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत ती क्रियाशीलता हिंदूंच्या रक्तात आढळत नाही. कारण हिंदूना स्वार्थापलीकडे काही कळत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

जगातील १८७ राष्ट्रांमध्ये आपले व्यवहारज्ञान किती? ७६ राष्ट्रांनी आक्रमण केलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. असे होण्याचे कारण हिंदूंच्या रक्तात आपण कोण आहोत? कशासाठी जगत आहोत? का मरणार आहोत? याची जाणीवच नाही. आणि तशी जाणीव असेलच तर स्वार्थापलिकडे त्याची त्यांना जाणीव होतच नाही, असेही ते म्हणाले.

चीन आणि पाकिस्तान हे भारताचे शत्रू आहेत, त्यांच्याविरोधात हिंदूंनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे. पण हिंदूंना आपला शत्रू कोण आणि मित्र कोण? हेच कळत नाही. तसेच, ही उणीव दूर केल्याशिवाय आपण राष्ट्र म्हणून उभे राहू शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

भारत हा जगातील सर्वात संपन्न देश आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला आणि बुद्धीसंपन्न लोकांचा असा हा एकमेव देश आहे. जगातील सर्व शास्त्रांचा जन्म भारतात झाला आहे. मात्र आपणच करंटे आहोत. आपल्याला परदेशाचे आकर्षण वाटते. मात्र ‘नासा’सारख्या संस्थेच्या ११ जणांच्या संचालक मंडळात १० भारतीय हिंदू आहेत. बंगालच्या उपसागरातून युरेनियम, थोरीयम असलेल्या भागातून वाळू उपसण्याचा करार अमेरिकेशी केला गेला. १८६२ ते १९८२ या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून हे दुर्मिळ मूलद्रव्य बाहेर नेण्यात आले आणि आता आपण त्यांच्याकडे युरेनियम, थोरियमची भीक मागत आहोत, या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधले.

Story img Loader