गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या विधानांमुळे चर्चेत आणि प्रसंगी वादात असणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचं अजून एक विधान आता चर्चेत आलं आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभिकरण लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी संभाजी भिडे यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी भूमिका मांडली. देशातील सध्याच्या परिस्थितीवर एकमेव तोडगा म्हणजे देशातील सर्व १२३ कोटी लोकांचा रक्तगट बदलावा लागेल, असं देखील संभाजी भिडे यावेळी म्हणाले.
“हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत”
यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी हिंदुस्थानला तीन बाधा झाल्याचं विधान केलं. “एखाद्या व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते. समाजात काही कार्यक्रमात खाण्या-पिण्यात अनेकांना विषबाधा होते. या बाधांवर उपाय आहेत. पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच्छ बाधा, दुसरी आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा. या तीन बाधांवर तोडगा कोणता असेल तर ते शिवछत्रपती आणि संभाजी महाराज. त्यांना प्रिय असणारं कार्य पूर्ण कसं होईल? यासाठी दैनंदिन जीवनात प्रयत्न करायला हवा”, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.
“मरणाच्या वेळीही छत्रपती शिवाजी महाराज…”
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूच्या वेळचा प्रसंग संभाजी भिडे यांनी सांगितला. “शिवछत्रपतींना काय प्रिय होतं? मरणाच्या वेळी देखील हा महापुरुष आपलं कुटुंब, लेकीबाळी, सुना-नातवंड यांचा विचार करत नव्हता. ३ एप्रिल १६८० रोजी दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी शिवछत्रपतींच्या देहातून प्राण निघून गेले. त्याआधी अर्धा मिनीट सगळं बळ एकवटून अंथरुणावरचं आपलं शरीर उचलून भोवतीच्या माणसांना शिवछत्रपती म्हणाले ‘आम्ही जातो, आमचा इथला मुक्काम संपला. सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा. सप्तसिंधू म्हणजे काय? हिमालयात उगम पावणाऱ्या गंगा, यमुना, सिंधू सरस्वती, नर्मदा, गोदावरी, कावेरी अशा सात नद्या”, असं संभाजी भिडे यांनी नमूद केलं.
डॉक्टरांबद्दल संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान; अपशब्दांचा वापर करत म्हणाले, “डॉक्टर आपटून…”
“१२३ कोटी लोकांचा रक्तगट बदलावा लागेल”
दरम्यान, हिंदुस्थानला जगात लौकिक मिळवून द्यायचा असल्यास १२३ कोटी लोकांचा रक्तगट बदलावा लागेल, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. “सबंध जगाचा त्राता म्हणून ताकद हिंदुस्थानला मिळाली पाहिजे. ती मिळायची असेल, तर एकच उपाय आहे. सबंध हिंदुस्थानचा रक्तगट बदलायला हवा. १२३ कोटी लोकांचा रक्तगट शिवाजी-संभाजीच करायला हवा. तो करण्याचा उद्योग शिवछत्रपतींच्या जीवनाच्या उपासनेतून होऊ शकतो. राष्ट्रोद्धार, राष्ट्रउन्नती हिंदुंच्या रक्तात उत्पन्न करण्यासाठी माझा जन्म आहे असं भगवंताला रोज सकाळी आपण म्हटलं पाहिजे”, असं भिडे यावेळी म्हणाले.
मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ५० वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुशोभिकरण करण्यात आलं आहे. सुशोभीकरण सोहळ्याच्या वेळी तरुण-तरुणी युवावर्ग हजारोंच्या संख्येने उपस्थित होता.