करोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अंशतः निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवरून शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सरकारवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. “करोना म्हणजे सरकारने उठवलेले थोतांड आहे. करोनामुळे सध्या मंदिरं बंद असून, देवांना कुलूपबंद करून ठेवण्यात आले आहे. वारी झाली असती, तर करोना दिसला नसता”, असं भिडे यांनी म्हटलं असून, त्यांच्या विधानाची चर्चा होत आहे.
सांगलीमध्ये माध्यमांशी बोलताना संभाजी भिडे यांनी हे विधान केलं आहे. “करोना म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, मात्र हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे. पंढरपूरच्या वारीवर घातलेल्या बंदीविरोधात वारकर्यांनी रस्त्यावर उतरायला हवं होतं. करोनामुळे सध्या मंदिरे बंद असून देवांना कुलूपबंद करून ठेवण्यात आले आहे. माझे केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे, तर देशातल्या सबंध देवभक्तांना आवाहन आहे की, खरंच देवभक्त असाल तर मंदिरांची कुलपे तोडून आत जाऊयात”, असं भिडे यांनी म्हटलं आहे.
“सरकार करोनाचा थोतांडपणा वाढवत आहे. लॉकडाऊन लावल्यामुळेच अधिक नुकसान होत आहे. सगळे मोकळे करू देत. देशात काहीही वाटोळे होणार नाही. करोना लॉकडाऊनमुळे जेवढे नुकसान झालेय त्याच्या एक अब्जांशदेखील वाटोळं होणार नाही. सरकार लॉकडाऊन लावतंय ते शंभर टक्के चूकच आहे,” असंही भिडे म्हणाले.
करोना हे थोतांड! रस्त्यावर उतरून मंदिरांची कुलुपं तोडायला हवीत; संभाजी भिडे यांचं विधानhttps://t.co/AaJQiBpnjH < येथे वाचा सविस्तर वृत्त#Sambhajibhide #Pandharpurwari #wari pic.twitter.com/F5jEpxk2Bm
— LoksattaLive (@LoksattaLive) July 13, 2021
“करोनामुळे आज देशात काय घडलं असेल, तर लोकांमध्ये फक्त भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वारीला जर बंदी घातली नसती, तर करोनामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असं देशात एकही उदाहरण मिळालं नसतं. माझं मत आहे की, करोना हे षडयंत्र आहे. देशाचे हे दुर्दैव आहे. पंढरपूरच्या वारीला बंदी घातल्यानंतर वारकर्यांनी रस्त्यावर उतरायला हवं होतं. एकादशीच्या दिवशी बंदी घातले जाते, त्यावेळी मंदिरांची कुलुपं तोडून मंदिर उघडी करायला पाहिजे”, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं.