Sambhaji Bhide रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी ही कपोलकल्पित आहे ती हटवण्यात यावी ही मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. वाघ्या कुत्रा होता आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली ही कथा काल्पनिक आहे त्याला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच ही समाधी हटवण्यासाठी सरकारला ३१ मेपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र शिवप्रतिष्ठान संस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडेंनी संभाजी राजे चुकीचं बोलत आहेत असं म्हटलं आहे.

संभाजीराजे यांचं म्हणणं काय?

संभाजीराजे म्हणाले, “मी आज पुरातत्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतली. त्यांना सविस्तर इतिहास सांगितला. माहितीच्या अधिकारातून अनेक शिवभक्तांनी पुरातत्व खात्याकडून जे मिळवलं होतं त्याची मांडणी तिथे केली. पुरातत्व खात्याने हे सांगितलं की वाघ्या कुत्र्याचं स्मारक याची त्यांच्या सुरक्षित स्थळांच्या यादीत नोंद नाही. १९३६ ला हे स्मारक बांधलं गेलं आहे. २०३६ पर्यंत ते स्मारक काढलं नाही तर त्याची नोंद संरक्षित स्थळांच्या यादीत केली जाईल. त्यामुळेच मी हा विषय हाती घेतला आहे. शिवभक्तांनी आधीही हा विषय हाती घेतला आहे पण त्यांना दुर्दैवाने न्याय मिळाला नाही. त्यामुळेच मी ही मागणी करतो आहे.” असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. दरम्यान शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी ही वाघ्या कुत्र्याची कथा सत्य आहे असं म्हटलं आहे.

संभाजी भिडे यांनी काय म्हटलं आहे?

वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली ही कथा सत्य आहे. त्यामुळेच त्याचं स्मारक उभारण्यात आलं आहे. माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात. देशाशी आपल्याला एकनिष्ठ रहायचं आहे याचं द्योतक म्हणून ते स्मारक हवंच. वाघ्या कुत्र्याच्या नावावर जे चाललं आहे आणि कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले जे बोलत आहेत ते १०० टक्के चूक आहे. ती कुत्र्याने उडी घेतली ही कथा सत्य आहे.

राजसंन्यास नाटकाचा संदर्भ देत काय म्हणाले संभाजीराजे?

“वाघ्या कुत्र्याचं स्मारक का उभं राहिलं? यावर अनेक वाद आणि दंतकथा आहेत. महाराष्ट्रातल्या एकाही इतिहासकाराने सांगितलेलं नाही की वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत म्हणून. शिवाजी महाराजांच्या काळात कुत्रे असू शकतात. स्वत: महाराजांचेही काही कुत्रे असू शकतात. पण राजसंन्यास या नाटकातून एक दंतकथा निर्माण झाली. त्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. त्यातून वाघ्या कुत्र्याची दंतकथा निर्माण झाली आणि त्याचं स्मारक तिथे बांधण्यात आलं”, असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. मात्र संभाजी भिडेंनी संभाजीराजेंची भूमिका चूक आहे असं म्हटलं आहे. त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीचं समर्थन केलं आहे.