संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. महात्मा गांधींचे वडील करमचंद नव्हते, तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे वडील होते, असं अजब विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. भिडेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली जात आहेत. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून केली जात आहे. तसेच संभाजी भिडे यांना भाजपाच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचाही आरोप केला जात आहे.
यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे हे स्वतंत्र आहेत. त्यांचा कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीत. भाजपाशी त्यांचा संबंध जोडणं योग्य नाही. गृहखात्याकडून त्यांचं विधान तपासून बघितलं जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- “संभाजी भिडे फक्त सोंगाड्या, हे सगळं टूलकिट…”, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींचा गंभीर आरोप!
संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर भाष्य करताना दीपक केसरकर म्हणाले, “संभाजी भिडे हे स्वतंत्र आहेत. ते कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीत. त्यांची एक वेगळी संघटना आहे. ती संघटना मुलांना गडावर घेऊन जाते. मुलांना छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल माहिती देते. हे सगळं काम त्यांच्या संघटनेकडून स्वतंत्रपणे केलं जातं. त्यामुळे त्यांचा भाजपाशी संबंध जोडणं योग्य नाही. गृहखातं या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेऊन असतं. गृहखातं अशा घटनांवर आवश्यक ते निर्णय घेतं. गृहखात्याकडून आधी असं वक्तव्य तपासून बघितलं जातं आणि मग त्यावर योग्य तो निर्णय घेतला जातो.”
हेही वाचा- पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा; म्हणाले, “एवढीच अपेक्षा आहे की…”
संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?
अमरावतीच्या बडनेरामध्ये झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांविषयी वादग्रस्त विधान केलं. “मोहनदास हे करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असं संभाजी भिडे म्हणाले.