राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड आणि मराठा संघटनांनी केला आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करत मराठा महासंघाच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. पंढरपूरमधील या आंदोलनामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, मराठा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी खासदार संभाजीराजे यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे छत्रपती संभाजी महाराज यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर बंद ठेवण्यात आले. पंढरपूर शहरातील मुख्य बाजार पेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सहकार्य केले आहे. मराठा महासंघाच्या वतीने बंद पाळण्यात आला. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
“छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रकृतीत बिघाड झाला, तर…”
मराठा महासंघाच्या वतीने सोमवारी पंढरपूर बंदची हाक दिली. पंढरपूर शहरातील स्टेशन रोड परिसरातील मुख्य बाजारपेठ व्यापाऱ्यांनी बंद ठेवून या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. या वेळी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रकृतीत बिघाड झाला, तर त्याला राज्यसरकार जबाबदार राहणार आहे, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी यावेळी दिला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले होते?
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.”
हेही वाचा : VIDEO: “समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य
“शिवाजी महाराजांनी गुरुदक्षिणा म्हणून समर्थांना राज्याची चावी देऊ केली”
“आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो,” असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.