काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढीस लागल्याचं वक्तव्य केलं होतं. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर हा संघर्ष वाढू लागला, असा थेट आरोपही राज ठाकरे यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पोस्ट करत राज ठाकरे यांना सुनावलं आहे.

राज ठाकरेंना जसे बाबासाहेब पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, अशी टीका गायकवाड यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केली आहे.


हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा राज ठाकरे यांना विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले, असंही गायकवाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. गायकवाड पुढे म्हणतात, राज ठाकरे यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की.

संभाजी ब्रिगेडने केलेल्या या टीकेला आता राज ठाकरे काय उत्तर देणार याच्याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

राज काय म्हणाले?

राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना राज ठाकरेंनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. “राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झाला आहे. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला”, असं राज ठाकरे म्हणाले. “कोण आहे हा जेम्स लेन? त्याने पुस्तक लिहिलं. तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? तो आता कोण आहे? कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणातून हे सगळं डिझाईन झालं आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितला गेला, ते करणारे अमुक जातीचे लोक आहेत वगैरे बोललं गेलं”, असंही राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.

Story img Loader