संभीजी ब्रिगेडने स्थापनेच्या ३२ वर्षानंतर आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. यासाठी भाजपासोबत जाण्याचा पर्यात योग्य असल्याचं मत संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केलं आहे. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडकडून संयुक्तरित्या प्रकाशित होणाऱ्या मराठा मार्ग या मासिकात खेडेकर यांनी लिहिलेल्या लेखात ही भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता या लेखाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नेहमीच भाजपाच्या विरोधात भूमिका घेणारी संभाजी ब्रिगेड सोबत जाण्यासाठी कसे तयार झाली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
“राज कारण हे राजकारणाच्या पद्धतीने व्हाव ही त्यामागची भूमिका आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून स्वबळावर लढण्याचे प्रयत्न आम्ही केले पण काही यश आलेलं नाही. या परिस्थितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपासह संघटनेचे कार्यकर्ते बोलत असतात. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचा पर्याय जवळपास नाहीच आहे. त्यामुळे राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने करण्यासाठी जो पर्याय उपलब्ध आहे तो भाजपाचा आहे. त्यानुसार संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी तो पर्याय तपासून बघावा आणि दोघांच्या एकमतावर राजकारण करावं ही संकल्पना आहे,” असे पुरोषत्तम खेडेकर यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले आहे.
पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडून अशाप्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आमची कोअर कमिटी निर्णय घेईल. असा काही प्रस्ताव असेल तर तो राज्याच्या प्रदेशाध्यक्षांकडेच यायला हवा. आमचा पक्ष हा जगभर पसरलेला आहे. देशात १२ राज्यात आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे इतक्या सहजपणे हे निर्णय होत नाहीत. त्याची मोठी प्रक्रिया असते, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पुण्यात ते एबीपी माझासोबत बोलत होते.
‘मराठा मार्ग’मध्ये काय नक्की काय म्हटलं आहे?
मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडकडून संयुक्तरित्या प्रकाशित होणाऱ्या मराठा मार्ग या मासिकात पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी काळात राजकीय वाटचाल करताना भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची भूमिका मांडली आहे. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकामध्ये संपादकीय लेख लिहिला आहे.
“महाआघाडीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीनही पक्षांची इच्छा असली तरी ते संभाजी ब्रिगेडला वाटा देण्यास नकार देण्याची शक्यता अधिक आहे. त्यांची प्रवृत्ती संभाजी ब्रिगेडला दूर ठेवून केवळ त्यांच्या नावाचा आणि कामाचा एकतर्फी लाभ घेणं आहे. तसेच ते संभाजी ब्रिगेडला गृहीत धरून आहेत. भाजपा सत्तेत आली तरी हरकत नाही, पण संभाजी ब्रिगेडला सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे ही या तीनही पक्षांची मानसिकता आहे. या परिस्थितीत संभाजी ब्रिगेडला सत्ता हस्तगत करायची आहे. संभाजी ब्रिगडेला खूप मर्यादा आहे. स्वबळ अवघड आहे. शेवटी भाजपा युती हाच पर्याय उरतो. मराठा सेवा संघ आणि आरएसएस यांची तत्त्व पूर्णपणे परस्परविरोधी आहेत. ती तशीच राहतील. पण राजकारणात अंतिम यश हेच एकमेव तत्त्व असते,” अशी भूमिका खेडेकर यांनी मांडली आहे.
भारतीय जनता पक्ष हा अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्त्वातील पक्ष आहे. विशेष म्हणजे मराठा सेवा संघाची संपूर्ण मांडणी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेच्या पूर्णपणे विरोधात आहे. मात्र तरीही पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा विचार मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.