मराठा आरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा करणारे आमदार विनायक मेटे याचे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्यानमंतर एक तास उशिराने आपत्कालीन मदत पोहोचली. याच कारणामुळे राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी तर या घटनेला केंद्र आणि राज्य सरकार जबाबादार आहे, अशा गंभीर आरोप केला आहे. अपघात झाल्यानंतर लवकर आप्तकालीन मदत मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे काय नियमावली आहे, असा सवालही त्यांनी केला. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
“विनायक मेटे यांना मी श्रद्धांजली वाहतो. सरकारने जी चौकशी करायची आहे ती करावी. विनायक मेटे यांच्या मृत्यूला केंद्र तसेच राज्य सरकार जबाबदार आहे. अपघात झाल्यानंतर मेटे यांना एक तास उशिराने आपत्कालीन मदत मिळाली. सरकारकडे आपत्कालीन सुविधा पुरवण्याची काय नियमावली आहे,” असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.
हेही वाचा >> Rakesh Jhunjhunwala Death: भारताचे ‘वॉरन बफे’ अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवालांचे निधन
“मुंबई-पुणे या मार्गावर रहदारी असते. येथे आपत्कालीन मदत पोहोचविणाऱ्या दोन ते तीन गाड्या असायला हव्यात. अशी अचानक घटना घडली तर मदत पोहोचावी म्हणून केंद्र तसेच राज्य सरकारने योग्य ती तरतूद करायला हवी,” अशी मागणीदेखील संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
हेही वाचा >> सलमान रश्दींवरील प्राणघातक हल्ल्यानंतर आता जे. के. रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी
“विनायक मेटे मराठवाड्याचे सुपुत्र आणि मराठा समाजाची शान होते. आज ते आमच्यातून निघून गेले आहेत. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. ही पोकळी कशी भरून निघेल याचे उत्तर आमच्याकडे नाही. बीडसारख्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीतून ते आले. गरीब मराठा समाजाला झळ बसू नये यासाठी त्यांचा लढा सुरू होता. विनायक मेटे यांनी मराठा समजाची बाजू प्रभावीपणे मांडली. मोठे बंधू म्हणून ते मला नेहमी सल्ला द्यायचे. सरकारवर दबाव टाकायचा असेल तर आपण एकत्र येणे गरजेचे आहे, असे ते नेहमी सांगायचे,” असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी मेटेंच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले.