Sambhaji Chhatrapati Devendra Fadnavis Oath Ceremony Advertisement : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना तब्बल ११ दिवस लागले. अखेर आज महायुती राज्यात सत्तास्थापन करणार असून भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास राजी झाले आहेत. अजित पवार तर आधीपासूनच या पदासाठी तयार होते. त्यांनी सुरुवातीलाच भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा जाहीर केला होता. “एकनाथ शिंदेंचं माहिती नाही मात्र मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे, मी थांबणार नाही”, अशा शब्दांत अजित पवारांनी आधीच त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं समीकरण पाहायला मिळणार आहे. आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार हे तिघे मंत्रिपदाची शपथ घेतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, भारतीय जनता पार्टीने या शपथविधी सोहळ्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सर्व वृत्तवाहिना, वृत्तपत्र आणि समाजमाध्यमांवर या जाहिराती झळकत आहेत. मात्र, काही भाजपा समर्थकांनी व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या जाहिरातीवर आक्षेप नोंदवला आहे. या जाहिरातीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आहिल्याबाई होळकर या महान व्यक्तींचे फोटो आहेत. त्यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे फोटो आहेत. तसेच, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचे फोटो देखील आहेत. मात्र यावर, राजर्षी शाहू महाराजांचा फोटो नसल्यामुळे माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्षेप नोंदवला आहे. तर, यावर वीर सावरकरांचा फोटो नसल्यामुळे सावरकरप्रेमी व काही भाजपा कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.

हे ही वाचा >> “आम्ही सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंना स्पष्ट सांगितलंय…”, दीपक केसरकरांनी सांगितलं शिवसेनेच्या बैठकीत काय झालं?

माजी खासदार संभाजी छत्रपतींचा संताप

संभाजी छत्रपती म्हणाले, “भारतीय जनता पार्टीच्या जाहिरातीत अनेक थोर महापुरुषांचा फोटो आहे मात्र त्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा फोटो नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. माझ्या कानावरही हे प्रकरण आलं आहे. अनेकांनी ती जाहिरात पाहिली आहे ते पाहून वाईट वाटलं. महाराष्ट्र घडवण्यात छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचं मोठे योगदान आहे. मात्र त्यापैकी शाहू महाराजांना बाजूला करून भारतीय जनता पार्टीने ही जाहिरात दिली आहे. ही न पटणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रात असले प्रकार चालणार नाहीत”.

हे ही वाचा >> सत्तास्थापनेनंतर पहिला कोणता निर्णय होणार? लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत केसरकरांचं मोठं वक्तव्य; महिलांना गोड बातमी मिळणार?

माजी खासदार म्हणाले, “महाराष्ट्राच्या जडणघडणीत शाहू महाराजांचं महत्त्वाचं स्थान आहे. परंतु, शाहू महाराजांना बाजूला ठेवायचं आणि केवळ इतर महापुरुषांचं नाव घ्यायचं हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रात हे खपवून घेतलं जाणार नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही. भारतीय जनता पार्टीने त्यांची चूक दुरुस्त करावी अशी मी त्यांना विनंती करतो”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji chhatrapati angry on bjp devendra fadnavis oath ceremony advertisement as no photo of shahu maharaj asc