राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी माफी मागावी तसेच त्यांना पदावरुन दूर करावे, अशी मागणी केली जात आहे. असे असताना संभाजी छत्रपती यांनीदेखील कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे तसेच या पदावर महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा >>> दहीहंडी सणानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी, राज्य सरकारची घोषणा

“विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो किंवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत. त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे. तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा आणि त्याबद्दल आदर असणारी एखादी सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राची राज्यपाल म्हणून नियुक्ती करावी,” अशी मागणी संभाजी छत्रपती यांनी केली आहे.

हेही वाचा >>> “हे पार्सल परत पाठवायला हवं”; वादग्रस्त व्यक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची राज्यपाल कोश्यारींवर सडकून टीका

राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर मुक्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली. “राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे.” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

त्यांनी सत्य परिस्थिती मांडली आहे- प्रकाश आंबेडकर

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांचे समर्थन केले आहे. “राज्यपालांनी लगावलेला टोला हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील मराठी नेत्यांना आहे. या पक्षांनी एवढे वर्षे सत्ता उपभोगली. पण हे पक्ष अजूनही अर्थिक व्यवहार महाराष्ट्राच्या हातामध्ये देऊ शकलेले नाही. हा व्यवहार अजूनही गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या हातात आहे. राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा बिलकूल अपमान झालेला नाही. त्यांनी सत्य परिस्थिती मांडली आहे,” अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

Story img Loader