शिवसेना आणि भाजपामध्ये झालेल्या जागावाटपानंतर मतदारसंघ मित्रपक्षाच्या वाटल्याला गेल्याने दोन्ही पक्षातील स्थानिक नेते दुखावल्याचे चित्र दिसत आहे. असंच काहीसं घडलं आहे लातूर ग्रामीणच्या जागेसंदर्भात. ही जागा सेनेला जाहीर झाल्याने पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या घराबाहेर ही जागा भाजपानेच लढवली पाहिजे अशी मागणी करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले दिला. या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी घराबाहेर आलेले राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना अश्रू अनावर झाले.
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाने युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर झालेल्या जागा वाटपामध्ये लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला मिळाली. या निर्णयामुळे मुंडे समर्थक आणि भाजपाचे रमेश कराड समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. पंजका मुंडेचे निकटवर्तीय असणाऱ्या कराड यांनी दोनदा पराभव झाल्यानंतरही या भागामध्ये आपला राजकीय दबदबा कायम ठेवला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पक्षांमधील तरुण कार्यकर्त्यांना भाजपामध्ये प्रवेश केला आहे. असे असतानाही जागा वाटपामध्ये ही जागा शिवसेनेला सोडल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणे चुकीचे असल्याचे मत मांडत हा निर्णय मागे घेऊन लातूर ग्रामीणमधून भाजपा उमेदवार उभा करावा या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. निलंगेकरांच्या घराबाहेर घोषणाबाजी करत लातूर ग्रामीण भाजपालाच हवा असं सांगत या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी निलंगेकर यांनी स्वत: कार्यकर्त्यांची समजूत घातली. मात्र यावेळी त्यांनाच रडू आल्याचे पहायला मिळाले. आपण यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांच्या भावना मांडू असं निलंगेकर यांनी सांगितलं.
निलंगेकर यांनी येऊन समजूत घातल्यानंतरही कार्यकर्त्यांनी लातूर ग्रामीण भाजपाला मिळाली नाही तर जिल्ह्यामध्ये एकही भाजपा उमेदवार निवडून देणार नाही असं इशाराच दिला आहे.