भाजपा आमदार संभाजी पाटील-निलंगेकर आणि माजी मंत्री, काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्यात राजकीय टीका-टिप्पणी सुरु असते. अशातच संभाजी पाटील यांनी निधीवरुन देशमुखांना खोचक टोला लगावला आहे. ज्यांना आपल्या मतदारसंघात साध्या मुताऱ्या बांधता आल्या नाहीत, त्या सुद्धा आम्ही बांधल्या. याची जाणीव ठेवावी, असं म्हणत संभाजी पाटील यांनी अमित देशमुखांना डिवचलं आहे.
संभाजी पाटील म्हणाले, “लातूरचा इतिहास काढून बघावं. २०१४ ते २०१९ भाजपा सरकारच्या काळात सर्वात जास्त निधी दिला. तेथील आमदारांनी माझ्याबरोबर बसावं आणि इतिहास काढून सांगावं कोणत्या साली जास्त पैसे आले होते. पूर्ण काँग्रेसच्या कार्यकाळात जेवढे पैसे आले नव्हते, तेवढं आम्ही दिलं आहे.”
हेही वाचा : “बाळासाहेब ठाकरेंना ७५ वर्षांचा म्हातारा म्हणणाऱ्याला…”, योगेश कदमांची सुषमा अंधारेंवर टीका
“लातूर शहरातील एसटीपी प्रकल्पासाठी ३५० कोटी रुपये दिले होते. साधं मतदारसंघातील मुताऱ्या त्यांना बांधता आल्या नाही. त्यासुद्धा आम्ही बांधल्या आहेत. एवढी तरी जाणीव ठेवावी. आमचा विरोध करा, पण निलंग्याचा विरोध कशासाठी करायचा,” असा सवाल संभाजी पाटील यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : “बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर…”, शरद पवारांचं वक्तव्य
“आम्हाला प्रिन्स नको, तर…”
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अमित देशमुख भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. तेव्हा संभाजी पाटील यांनी म्हटलं होतं, “भाजपात अनेकजण प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यात लातूरच्या प्रिन्सची सुद्धा इच्छा झाली आहे. पण, लातूरमध्ये ऑक्सिजन नव्हतं, तेव्हा प्रिन्स शहराबाहेर होते. आता सत्तेवर राहण्यासाठी आणि आपण केलेली चुकीची काम लपवण्यासाठी भाजपात यायचं म्हणत आहेत. मात्र, हे काय येत नाहीत आणि आम्ही काय घेत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्हाला प्रिन्स नको, तर सर्वसामान्य कार्यकर्ता भाजपात हवा.”